![]()
पाचोरा या तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका उपक्रमाने गेली सोळा वर्षे हजारो भाविकांची तहान भागवण्याचे पुण्यकार्य अखंड सुरू ठेवले आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने तसेच दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक मदतीने राबविण्यात येणारी जल सेवा – शुद्ध पिण्याचे पाणी (Aquwa) वाटपाची ही परंपरा आज पाचोरा तालुक्यातील विविध यात्रा आणि धार्मिक सोहळ्यांचा अविभाज्य भाग बनली आहे. सालाबादप्रमाणे पौष महिन्यात पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील काळभैरव मंदिराच्या भव्य-दिव्य परिसरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. जळगाव, धुळे, संभाजी नगर, बुलढाणा तसेच आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून लाखो भाविक भक्त श्रद्धेने या यात्रेसाठी दाखल होतात. काळभैरवाच्या दर्शनाने मनातील प्रश्न, चिंता व अडचणी दूर होतात अशी भाविकांची दृढ श्रद्धा असून दर्शनानंतर भाविक वरण-भात, बट्टी, वांग्याची भाजी आणि कबूल केलेल्या वजनाइतका गूळ मंदिरात चढवतात. हा गूळ नंतर प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटप केला जातो. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीने ओतप्रोत असलेल्या या यात्रेत मात्र पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस सोय नसल्याने दरवर्षी भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक मदतीतून सुरू असलेली पाणपोळी व जलसेवा यात्रेमध्ये आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त करून गेली आहे. संपूर्ण यात्रेच्या परिसरात शुद्ध, थंड आणि सहज उपलब्ध पिण्याचे पाणी देणारा हा एकमेव मंडप निस्वार्थ भावनेने उभारलेला दिसून येतो. कडाक्याच्या उन्हात, प्रचंड गर्दीत आणि सतत चालणाऱ्या दर्शन रांगेत ही जलसेवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. “पाणी हीच खरी सेवा” या भावनेतून उभारलेला हा उपक्रम कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आणि सातत्याने आपले कार्य करीत आहे. या मंडपात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसते. विशेषतः वयोवृद्ध भाविक, लहान मुले आणि महिला या जलसेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसतात. अनेक वृद्ध भक्त सेवा संघाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना मनापासून शुभाशीर्वाद देताना दिसून येतात. कुणी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो तर कुणी “देव तुमचं भलं करो” असे शब्द उच्चारतो आणि या शब्दांतूनच या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते. मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक हरी पाटील हे या संपूर्ण उपक्रमामागील प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक सहकार्यामुळे ही जलसेवा गेली सोळा वर्षे अखंड सुरू असून समाजकार्य केवळ भाषणातून नव्हे तर अशा प्रत्यक्ष कृतीतूनच प्रभावी ठरते हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या सेवेत भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिव सुनील परदेशी, ट्रस्ट सदस्य प्रकाश परदेशी, पदम परदेशी, प्रकाश पाटील, संजय सोनवणे, देवीलाल परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, पोलिस कर्मचारी शाम हटकर, व्यापारी नितीन चौधरी, माणिक पाटील, संतोष पाटील, उद्योजक समर्थ दीपक पाटील, राका जी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत हे कार्यकर्ते स्वतःहून पाणी वाटप करतात, गर्दीतून वाट काढून तहानलेल्या भाविकांपर्यंत पाणी पोहोचवतात आणि कुठेही गैरसोय होऊ देत नाहीत. ही जलसेवा केवळ एक धार्मिक किंवा औपचारिक उपक्रम न राहता समाजातील माणुसकीचे दर्शन घडवते. लाखो भाविकांच्या गर्दीत कुणीही ओळखीचा नसताना, कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरते. पाण्याच्या एका घोटातून मिळणारा दिलासा, थकलेल्या देहाला मिळणारी ऊर्जा आणि मनाला मिळणारे समाधान हे या उपक्रमाचे खरे यश असून सावखेडा काळभैरव यात्रेत उभारलेली ही जलसेवा आज संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







