श्री.गो.से. हायस्कूलमध्ये ‘कलारंग २०२५–२६’चा उत्साहपूर्ण सोहळा…-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ

0

Loading

पाचोरा- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे शालेय वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कलारंग २०२५–२६’ या बहारदार सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘कलारंग २०२५–२६’ चा उद्घाटन सोहळा पार पडणार असून या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापन समिती चेअरमन खलील देशमुख हे असतील तर कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यीक प्रा. वा. ना. आंधळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच वेळी रांगोळी, चित्रकला, हस्तकला तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. कलारंग अंतर्गत रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन तसेच सामूहिक नृत्य, गीतगायन, फॅन्सी ड्रेस अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सादरीकरण कौशल्य आणि संघभावना अनुभवायला मिळणार आहे. उपस्थित पाहुणे, पालक व नागरिकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक मॉडेल्समधून त्यांची प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येणार आहे. शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यक्रमांचा समारोप होणार असून याच दिवशी दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी हे असतील तर पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आ. दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, श्री गो. से. हायस्कूलचे तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती व तांत्रिक विभाग व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ओम राठी (दर्शन फॅशन), डॉ. सुनिल पाटील (सुनिल नेत्रालय), नंदकुमार कोतकर (कोतकर जनरल स्टोअर्स), अनुराग भारतीया (विजय कापड), रमेश आबा पाटील (गजानन डेअरी), रवी अग्रवाल (नेरीवाला ड्रेसेस), डॉ. स्वप्निल पाटील (सिध्दीविनायक हॉस्पिटल), डॉ. अमोल जाधव (दिशा डेंटल क्लिनिक), अतुल शिरसमणे (आशीर्वाद कॉम्प्युटर), नंदू प्रजापत (आनंद मेडिकल) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य, उपप्रमुख रविंद्र बोरसे, प्रवेक्षिका अंजली गोहिल, प्रवेक्षक आर. बी. तडवी, आर. बी. बांठिया, क्रिडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” या ब्रीदवाक्यानुसार ज्ञान, कला आणि संस्कार यांचा संगम साधणारा ‘कलारंग २०२५–२६’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरेल, सदरचा कार्यक्रमाचे सादरीकरण २५०० विद्यार्थी करणार आहे. असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून या आनंद सोहळ्यास पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here