पाचोरा येथे वरिष्ठ न्यायालयासाठी ठाम भूमिका; दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा : पाचोरा येथील दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पाचोरा न्यायालयातील मुख्य वकील कक्षात दुपारी 2 वाजता उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या महत्त्वपूर्ण सभेत पाचोरा येथे वरिष्ठ स्तरावरील दिवाणी व फौजदारी न्यायालय स्थापन व्हावे, यासाठी ठाम भूमिका घेण्यात येत कृती समिती गठीत करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रवींद्र अशोक ब्राह्मणे हे होते तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अण्णासाहेब भोईटे तसेच ज्येष्ठ सदस्य ॲड. बापू सैंदाणे यांची विशेष उपस्थिती होती. सभेची सुरुवात असोसिएशनचे सचिव ॲड. सुनील सोनवणे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून केली. त्यानंतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेतील मुख्य विषय पाचोरा न्यायालयास वरिष्ठ स्तराचे म्हणजेच सिनियर डिव्हिजन कोर्ट व स्वतंत्र फौजदारी न्यायालय मिळावे हा होता. पाचोरा तालुका लोकसंख्या, न्यायालयीन कामकाज तसेच भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे वरिष्ठ न्यायालयाची नितांत गरज असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. सध्या प्रलंबित खटल्यांची संख्या, नागरिकांना न्यायासाठी जळगाव अथवा इतर ठिकाणी करावी लागणारी धावपळ, वेळ व आर्थिक खर्च याचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अधिकृत पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी कृती समिती गठीत करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ही समिती सनदशीर, कायदेशीर व संघटित पद्धतीने वरिष्ठ न्यायालयाच्या मागणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, लोकप्रतिनिधींशी संवाद साधणे आणि न्यायालयीन पातळीवर आवश्यक ती प्रक्रिया राबवणे अशा विविध टप्प्यांवर काम करण्याबाबत विचारविनिमय झाला. येणाऱ्या काळात पाचोरा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय झालेच पाहिजे अशी ठाम भूमिका दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी व्यक्त केली आणि हा लढा पूर्णतः सनदशीर, शांततामय व कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्धार करण्यात आला. सभेस असोसिएशनचे ॲड. सुनील सोनवणे, ॲड. अंकुश कटारे, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. बबलू पठाण, ॲड. अमजद पठाण, ॲड. मंगेश गायकवाड, ॲड. करुणाकर ब्राह्मणे, ॲड. लक्ष्मीकांत परदेशी, ॲड. सागर सावळे, ॲड. प्रशांत मालखेडे, ॲड. कैलास सोनवणे यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचा समारोप असोसिएशनचे सचिव ॲड. सुनील सोनवणे यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून केला असून ही वार्षिक सभा पाचोरा शहर व तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here