![]()
पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम ओंकार मालकर यांच्या माळी समाजातील गेल्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारसीवरून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी ही निवड जाहीर केली असून, यावेळी माळी क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर उपस्थित होते. ठाणे येथे आज अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी मालकर यांच्याकडे सोपवण्यात आली. शालिग्राम मालकर यांनी समाजकार्याची सुरुवात तळागाळातून करत माळी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. ग्रामीण भागातील युवकांना संघटित करणे, समाजात जनजागृती घडवून आणणे, तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एकात्मतेची भावना बळकट करणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या कामामुळे समाजात विश्वास निर्माण झाला असून, हीच विश्वासार्हता त्यांच्या निवडीमागे निर्णायक ठरली आहे. नव्या जबाबदारीनंतर शालिग्राम मालकर आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात माळी समाजामध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविणार आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेत जास्तीत जास्त समाजबांधवांना सामावून घेणे, संघटन मजबूत करणे आणि समाजाच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठावरून न्याय मिळवून देणे, हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू असणार आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांशी निष्ठा राखत समाजहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडणे, युवकांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिला-युवक सहभाग वाढवणे, यावर ते भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या नियुक्तीमुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात माळी समाजाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समाजबांधव, कार्यकर्ते आणि शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून शालिग्राम मालकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली माळी क्रांती सेनेचे कार्य अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







