ज्याने पक्षासाठी सोने दिले तो उपनगराध्यक्ष… किशोर बारावकर, तर संकटात धावणारा सुमित पाटील गटनेता

0

Loading

पाचोरा – शहराच्या राजकीय इतिहासात निष्ठा, संघर्ष आणि सेवाभावाला न्याय देणाऱ्या निर्णयांची नोंद नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यपद्धतीचे जिवंत उदाहरण ठरणारी किशोर बारावकर यांची उपनगराध्यक्ष पदावर झालेली नेमणूक आणि सुमितदादा किशोरआप्पा पाटील यांची गटनेता म्हणून निवड ही केवळ पदांची घोषणा नाही, तर जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब करणारा निर्णय मानला जात आहे. या दोन्ही नियुक्त्यांमधून कार्यकर्त्यांच्या त्यागाला मान, निष्ठेला योग्य सन्मान आणि युवा नेतृत्वाला स्पष्ट दिशा देण्याची आमदार किशोरआप्पा पाटील यांची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांची निवड करताना कोणतेही आर्थिक, सामाजिक किंवा जातीचे गणित लावलेले नाही, तर सर्वसामान्यांचा हक्काचा, रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि चोवीस तास उपलब्धता हेच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत सक्रिय झालेले किशोर बारावकर हे पाचोरा शिवसेनेच्या संघर्षकाळाचे साक्षीदार आहेत. त्या काळात कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना मुंबई येथील तालुका संपर्कप्रमुखांना स्वतःच्या घरी मुक्काम, जेवणाची व्यवस्था करणे, प्रचारासाठी साधनसामग्री उभी करणे, हे सारे जबाबदारीने पार पाडणारा हा कार्यकर्ता होता. पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तिकीट अशोकबंधू मिसाळ यांना मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अशोक दत्तू पाटील यांची पान टपरी आणि गोराडखेडा येथील दादासाहेब हनुमान बुधा पाटीत यांचे दुकान हेच शिवसेनेचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. ज्या कार्यकर्त्याच्या घरी संधी मिळेल तिथे जेवण, दिवसभर प्रचार आणि पुन्हा संघर्ष, अशी ती परिस्थिती होती. त्या काळातील एक प्रसंग आजही कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी क्रूझर मिळाली, मात्र डिझेलसाठी पैसे नव्हते. पहाटेपासून उभी असलेली क्रूझर दुपारचे दोन वाजून गेले तरी हलू शकली नाही. अखेर किशोर बारावकर यांनी आपल्या गिरड रोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनी निवासस्थानी जाऊन मावशींना म्हणजेच आपल्या आईंना परिस्थिती सांगितली. व सोने मागीतले ते घरातील सोने गहाण ठेवून डिझेलची व्यवस्था करण्यात आली आणि प्रचाराचा रथ पुढे सरकला. हा प्रसंग केवळ त्यागाचा नाही, तर कार्यकर्त्याच्या निष्ठेचा, पक्षासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या वृत्तीचा दाखला आहे. अशा या कार्यकर्त्याच्या आयुष्याचे सोने स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील, स्वर्गीय मुकुंदआण्णा बिल्दीकर आणि प्रामुख्याने हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ओळखले. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिलेली उपनगराध्यक्ष पदाची  ही पावती म्हणजे एका सर्वसामान्य रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला दिलेला न्यायच म्हणावा लागेल. तसेच पाचोरा नगरपालिका शिवसेनेच्या गटनेतेपदी सुमित किशोरआप्पा पाटील यांची झालेली निवड ही युवा नेतृत्वाला चालना देणारा निर्णायक टप्पा ठरत आहे. वडील आमदार आहेत, आई नगराध्यक्ष आहे म्हणून मुलगा गटनेतेपदी असा कोणताही निकष या निवडीमागे लावलेला नाही, हे पाचोरा शहर, तालुका आणि पंचक्रोशीतील जनता सहज सांगेल. उलट आमदार किशोरआप्पा पाटील यांना अभिमान वाटावा असा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला आहे, असेच या निवडीकडे पाहिले जात आहे. सुमितदादा यांची नम्रता, मितभाषी स्वभाव, निर्व्यसनी जीवनशैली आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद हे गुण मतदारसंघाने अनेक वेळा अनुभवले आहेत. विशेषतः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात सुमितदादांनी दाखवलेली कृती संपूर्ण मतदारसंघाच्या मनात घर करून गेली. सरकारी यंत्रणा काय करेल, वडील आमदार म्हणून काय भूमिका घेतील याची वाट न पाहता, स्वतः खिशातून पैसे खर्च करून गुडघ्याएवढ्या, कधी कधी कमरेएवढ्या पाण्यातून थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन मदत करण्याची वृत्ती त्यांनी दाखवली. हा अनुभव केवळ पाचोरा मतदारसंघानेच नव्हे, तर महाराष्ट्रानेही पाहिला. राजकीय वारसा असूनही केवळ वारशावर विसंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर राजकीय प्रवाहात कसे विलीन होता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. बापापेक्षा बेटा सवाई ही म्हण येथे आठवावी, मात्र अनेकांच्या मते आ. किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत सुमितदादा पाचपटीने पुढे जात असल्याचे दिसून येते. पाचोरा नगरपालिका सभागृहात प्रथमच नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर लगेचच गटनेतेपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची पावतीच मानली जात आहे. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर आणि गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील यांच्या निवडीमुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून हे फक्त पद नाही, ही जबाबदारी आणि जनतेचा विश्वास आहे ही भावना अधिक बळकट झाली आहे. या दोन्ही नियुक्त्यांबद्दल ध्येय न्यूज व साप्ताहिक झुंज वृत्तपत्रातर्फे किशोर बारावकर आणि सुमित किशोरआप्पा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळातून पाचोरा शहराच्या विकासाला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here