लेवेगुजर भवन खारघर: विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आपलेच घर

0

Loading

पाचोरा – माझी मुलगी डॉ. कादंबरी संदीप महाजन हिने एमजीएम मेडिकल कॉलेज येथे फिजिओथेरेपीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून तिची इंटर्नशिप सुरू होती. शिक्षणाच्या प्रारंभापासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तिचा निवास कामोठे येथेच होता. मात्र एक जानेवारीपासून सदर रूम खाली करणे आवश्यक असल्याने अचानक निवासाचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे तिच्या इंटर्नशिपचे केवळ सात–आठ दिवस शिल्लक होते. एवढ्या अल्प कालावधीसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध निवास मिळवणे हे मोठे आव्हान ठरले. या काळात अनेक ठिकाणी रूमचा शोध घेतला, मात्र अपेक्षेप्रमाणे सुविधा कुठेच मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी भाड्याच्या अटी अत्यंत जाचक होत्या, तर काही ठिकाणी सुरक्षिततेबाबत समाधानकारक वातावरण नव्हते. मुलगी एकटी असल्याने हॉटेलमध्ये राहणेही सुरक्षित वाटत नव्हते. या सगळ्या परिस्थितीत पालक म्हणून मनात मोठी चिंता आणि अस्वस्थता होती. याच दरम्यान खारघर येथे गुजर मंडळावर मुलींसाठी निवासाची सुविधा असल्याची माहिती मिळाली. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तेथील व्यवस्थापक निळूभाऊ चौधरी (Mo.98199 18088 ) आणि महेश भाऊ (Mo 8169487076)यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ‘मंडळावर ठेवणे’ ही कल्पना थोडी संकुचित वाटली. मात्र एमजीएम मेडिकल कॉलेज खारघरजवळ असल्याने आणि केवळ दोन–तीन दिवसांचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने मुलीला तिथे ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या काही दिवसांतच आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. रेवे गुजर भवन खारघर येथील स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता, नियमबद्ध व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी असलेले अनुकूल वातावरण आणि आपुलकीची वागणूक पाहून मनापासून समाधान वाटले. विशेषतः मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून जाणवले वेळेचे काटेकोर पालन, जबाबदार व्यवस्थापन आणि एकूणच सकारात्मक शिस्त यामुळे पालक म्हणून मनाला मोठा दिलासा मिळाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था तसेच विविध स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस हे सर्व परिसरातच जवळ उपलब्ध आहेत. एखादी शैक्षणिक संस्था थोडी दूर असली तरीही सहज व सुरक्षित वाहन व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासाची कोणतीही अडचण भासत नाही. त्यामुळे अभ्यास, क्लासेस आणि इंटर्नशिप यांचा ताण न येता नियोजनबद्ध दिनक्रम ठेवणे सहज शक्य होते. तसेच आपल्या समाजातील मुले-मुली बाहेरगावी शिक्षणासाठी गेल्यानंतर सर्वात मोठी अडचण भासते ती जेवणाची. या दृष्टीने लेवेगुजर भवन खारघर येथे अन्न व आरोग्य व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. येथे घरगुती डब्याद्वारे दिले जाणारे Food & Health हे सकस, स्वच्छ, घरगुती आणि सात्विक स्वरूपाचे असून समाजाच्या खानदेशी चवीप्रमाणे आखलेला मेन्यू असल्याने मुलांना घरचीच आठवण होते. योग्य पोषण, आरोग्यदायी आहार आणि नियमित वेळेचे जेवण यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. खरं तर या अनुभवामुळे एकच खंत मनात राहिली की खारघर गुजर मंडळ सुरू झाल्यानंतर आपण सुरुवातीलाच मुलीला इथे का शिफ्ट केले नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो मांडताना कोणतीही औपचारिकता नाही, तर एका पालकाच्या मनातील प्रामाणिक भावना आहेत. आजच्या काळात, विशेषतः मुंबईसारख्या मेट्रो सिटी परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुरक्षित निवास ही सर्वात मोठी गरज आहे. अशा वेळी खारघर गुजर मंडळ ही केवळ निवास व्यवस्था नसून, ती विश्वासाची

आणि सुरक्षिततेची हमी देणारी जागा आहे. याच अनुषंगाने व्यवस्थापक मंडळालाही नम्र विनंती करावीशी वाटते की इतकी मोठी इमारत उभारणे आणि त्याचे नियमित मेंटेनन्स करणे, तेही मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी, हे निश्चितच आव्हानात्मक आणि खर्चिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या समाजबांधवांच्या शिफारशीवरून तसेच आवश्यक तपासणी करून इतर समाजातील विद्यार्थिनींनाही रूम उपलब्ध करून देण्याचा विचार केला तर तो सर्वार्थाने सकारात्मक ठरेल. यामुळे रूमची उपलब्धता वाढेल, मंडळाच्या देखभालीस हातभार लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थिनींना विद्यार्थिनींचीच साथ मिळेल. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मुलींची संख्या अधिक असणे हे अधिक आश्वासक ठरते आणि सामूहिक राहणीमानातून परस्पर सहकार्य व आपुलकी वाढीस लागते. त्यामुळे गुजर बांधवांना आवर्जून सांगावेसे वाटते की आपल्या मुला–मुलींना इकडे–तिकडे असुरक्षित ठिकाणी ठेवण्यापेक्षा खारघर गुजर मंडळासारख्या आपल्या हक्काच्या, आपल्या माणसांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या ठिकाणी ठेवावे. हे मंडळ म्हणजे केवळ इमारत नसून, ते आपलेच घर आहे, ही भावना इथे काही दिवस राहिल्यानंतर ठळकपणे जाणवते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मंडळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून पालक आणि विद्यार्थिनी दोघांनाही मानसिक स्थैर्य देणारे आहे. खारघर गुजर मंडळ उभारणीसाठी ज्या दात्यांनी आर्थिक मदत दिली, ज्यांच्या मनात ही संकल्पना होती, ज्यांनी वेळ, श्रम आणि ऊर्जा खर्च केली, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्ञात–अज्ञात सर्वांनी जे सहकार्य केले, त्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. आज अनेक पालक निर्धास्तपणे आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पाठवू शकतात, यामागे या मंडळाच्या उभारणीमागील दूरदृष्टी, सामाजिक भान आणि सेवाभाव कारणीभूत आहे. अशा संस्थांची गरज भविष्यात आणखी वाढणार आहे. खारघर गुजर मंडळ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, समाजाने एकत्र येऊन उभ्या केलेल्या या सुरक्षित आश्रयस्थानी अनेक विद्यार्थिनींची स्वप्ने सुरक्षितपणे पूर्णत्वाकडे जात आहेत. या सर्व सेवाभावी हातांना शतशः प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here