![]()
पाचोरा – येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी महिलांच्या सन्मान, स्वातंत्र्य व सामाजिक जडणघडणीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत तसेच महिला मुक्ती व स्त्री शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवली, तर राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श नेतृत्वाची घडण घडवून महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या मानवंदना कार्यक्रमात पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगरसेवक गणेशबापू पाटील, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजयभाऊ गोहील, पत्रकार संदीप महाजन, राहुल बोरसे, राजू पाटील, एस. ए. पाटील, विनोद पाटील, सुदर्शन महाजन, बाबाजी ठाकरे, सुनील महाजन, नगरसेवक बंटी हटकर, संतोष महाजन, कन्हैया देवरे, गणेश पाटील, विजय पाटील, माजी नगरसेवक ॲड. दीपक पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून समाजसुधारकांच्या विचारांना अभिवादन केले. महिलांना शिक्षणाची संधी मिळाल्याशिवाय समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही, हा संदेश सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कृतीतून दिला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच आजच्या काळात महिलांनी शिक्षण, सामाजिक क्षेत्र, प्रशासन आणि राजकारणात अग्रस्थानी राहून फुले दांपत्यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत महिलांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यात बजावलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारातून घडलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत, प्रत्येक आई ही आपल्या कुटुंबातील जिजाऊ असते, हा भावनिक संदेश उपस्थितांना देण्यात आला. या मानवंदना कार्यक्रमामुळे पाचोरा शहरात सामाजिक जाणीव जागृत झाली असून नव्या पिढीला स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







