![]()
पाचोरा -जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे स्काऊट-गाईड विभागाच्या माध्यमातून “खरी कमाई (फन फेअर)” हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून स्वयंरोजगार, व्यवहारज्ञान आणि जीवनकौशल्ये शिकविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागणी-पुरवठा यांचा समन्वय, उत्पादन-विक्रीची साखळी, खर्च-नफा यांचे प्राथमिक गणित, ग्राहकांशी संवाद आणि संघभावना या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पाचोरा शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक सुमितभाऊ पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे दोन्ही मान्यवरांनी विशेष कौतुक केले. लहान वयातच कष्टाची किंमत आणि स्वावलंबनाची जाणीव झाली तर आयुष्यभर त्याचा उपयोग होतो, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात किशोर बारावकर यांनी केले, तर सुमितभाऊ पाटील यांनी उद्योगशीलतेचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची सातत्याने पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या फन फेअरमध्ये स्काऊट-गाईडच्या एकूण १४ संघांनी सहभाग नोंदवला होता. मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ आणि गुलाब संघ या संघांनी आपापल्या स्टॉल्सद्वारे कल्पकतेचा ठसा उमटवला. स्काऊट मास्टर निवृत्ती तांदळे सर यांनी सर्व संघनायकांचा आलेल्या पाहुण्यांसमोर परिचय करून देत प्रत्येक संघाचा उपक्रमातील सहभाग सविस्तरपणे मांडला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आणि व्यवस्थापित केलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. कुठे पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, तर कुठे सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. पदार्थांची चव, सादरीकरण, स्वच्छता, दरनिश्चिती आणि ग्राहकसेवा या सर्व बाबींवर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले होते. आलेल्या पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत संघनायकांकडून पदार्थांबाबत चौकशी केली आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या फन फेअरला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यांनी ग्राहक म्हणून सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड,गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, चेतना पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, राधा शर्मा, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार, पुजा देसले, वंदना पाटील, मंदा पाटील, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, गणेश शिंदे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन किरण बोरसे सर यांनी केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







