मीरा-भाईंदर प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या ॲड सना खलील देशमुख यांचा दणदणीत विजय

0

Loading

पाचोरा – येथील सामाजिक कार्यकर्ते, लासगाव येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा श्री गो से हायस्कूल शालेय समितीचे चेअरमन खालीलदादा देशमुख तसेच जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेहाना देशमुख यांची कन्या ॲड सना खलील देशमुख यांनी मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडणूक लढवत एकूण 57 टक्के मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातील उर्वरित 43 टक्के मते इतर तीन उमेदवारांमध्ये विभागली गेली असून स्पष्ट बहुमतासह मिळालेल्या या विजयामुळे काँग्रेस पक्षाला या प्रभागात महत्त्वाचे बळ मिळाले आहे. ॲड सना खलील देशमुख यांचा हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या गेल्या आठ ते नऊ वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची ही ठोस पावती मानली जात आहे. निवडणूकपूर्व काळातच त्यांनी महिलांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आर्थिक स्वावलंबनावर भर दिला होता. महिलांसाठी प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांचे मार्गदर्शन तसेच कायदेशीर सल्ला व मदतीचे उपक्रम त्यांनी प्रत्यक्षात आणले होते. या कामामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आणि त्यांच्या कार्याची ओळख घराघरात पोहोचली. सामाजिक आंदोलनांमध्येही ॲड सना देशमुख यांनी नेहमीच सक्रिय आणि ठाम भूमिका घेतली आहे. नागरी समस्या, महिला हक्क, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची तयारी आणि प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता यामुळे त्या परिसरात त्यांचे नाव लौकिकास आले. त्यामुळेच या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर मोठ्या विश्वासाने शिक्कामोर्तब केले. विशेष बाब म्हणजे ॲड सना खलील देशमुख या पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. शालेय जीवनापासूनच शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली होती. वकृत्व, नृत्य आणि नेतृत्वगुण या तिन्ही बाबतीत त्या पुढे असल्याचे शिक्षक आणि सहपाठी नेहमीच सांगत. शालेय कार्यक्रमांमध्ये मंचावर आत्मविश्वासाने मांडणी करणे, संघटनात्मक जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि सहकार्याची भावना जोपासणे हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच दृढ झाले. कौटुंबिक पार्श्वभूमीही त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची ठरली आहे. सामाजिक कार्य, शिक्षण आणि शिस्त यांचे संस्कार घरातूनच त्यांना लाभले. वडील खालीलदादा देशमुख यांचे सामाजिक कार्य आणि आई रेहाना देशमुख यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर स्पष्टपणे दिसून येतो. याच संस्कारांच्या बळावर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत सामाजिक न्यायासाठी काम करण्याचा मार्ग स्वीकारला. मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील या विजयामुळे पाचोरा आणि लासगाव परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या गावाशी नाते जपणारी, सामाजिक बांधिलकी टिकवणारी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत पोहोचल्याने अनेकांना अभिमान वाटत आहे. पुढील काळात प्रभागातील विकासकामे, महिलांचे प्रश्न, युवकांसाठी संधी आणि पारदर्शक प्रशासन यासाठी ॲड सना खलील देशमुख प्रभावी भूमिका बजावतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here