खान्देशच्या मातीचा सिंह गर्जला! आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये हितेश पाटील यास सुवर्ण पदक

0

Loading

पाचोरा – बँकॉक, थायलंड येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने आयोजित इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत खान्देशच्या मातीत घडलेल्या पैलवानाने आंतरराष्ट्रीय आखाड्यावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि भारत या देशांच्या सहभागाने पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या संघाने मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने सहभाग नोंदवला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंमधून १२५ किलो वजनगटासाठी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र पै. हितेश अनिल पाटील यांची निवड झाली होती. वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व

करत त्यांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत थायलंडच्या बलाढ्य पैलवानावर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. ताकद, तांत्रिक कौशल्य, संयम आणि रणनीती यांचा सुरेख मिलाफ दाखवत पै. हितेश पाटील यांनी हा सामना जिंकत भारतासाठी सर्वोच्च सन्मान मिळवून दिला. महाराष्ट्र केसरीसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्णविजेता ठरला असून त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित मानले जात आहे. आशियाई सुवर्णपदक विजेते व मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया चे सरचिटणीस प्रा. पै. अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे संघाला योग्य तयारी, आत्मविश्वास आणि यशाची दिशा मिळाली. या सुवर्णयशामुळे भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून संघटनेच्या कार्यपद्धतीचे देशभर कौतुक होत आहे. पाचोरा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेले पै. हितेश पाटील हे पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल धना पाटील (गाळण) यांचे सुपुत्र आहेत. ग्रामीण भागातील कष्ट, शिस्त आणि जिद्द याच संस्कारांतून घडलेला हा मल्ल पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयाचा तसेच पत्रकार संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीचा विद्यार्थी राहिला आहे. शिक्षणाबरोबरच कुस्तीची आवड जोपासत त्यांनी पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील राम मंदिर परिसरातील महावीर व्यायाम शाळा येथे कुस्तीचे धडे गिरवले. याच आखाड्यात त्यांनी स्वतःला घडवले आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे दोन वर्षे त्यांनी याच महावीर व्यायाम शाळेत कुस्तीचे कोच म्हणूनही जबाबदारी पार पाडत अनेक नवोदित मल्लांना घडवण्याचे कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील या सुवर्णपराक्रमानंतर पाचोरा, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण खान्देश परिसरात आनंदाची लाट उसळली असून कुटुंबीय, मित्रपरिवार, कुस्तीप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकापर्यंतचा पै. हितेश पाटील यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here