![]()
पाचोरा – साप्ताहिक पत्रकारितेचा दर्जा अधिक सक्षम, जबाबदार व काळानुरूप करण्याच्या उद्देशाने साप्ताहिक संपादक असोसिएशन (रजि.) व SAMPADAK ASSO (SSA) PRESS यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक संपादक कार्यशाळा व राज्यस्तरीय साप्ताहिक संपादक अधिवेशन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून अध्यक्ष राजेश म. जाधव, सचिव विजय अ. मोरे, खजिनदार संतोष जा. चव्हाण, कार्याध्यक्ष भिमराव धुळप, उपाध्यक्ष यतिन पवार व सारीका शिंदे, सहसचिव बारकू गायकवाड, सल्लागार उमाकांत आरोलकर व सूरजप्रकाश सांडेसर तसेच सदस्य मेहबूब कुरेशी व ईश्वर ताथवडे यांच्या सक्रिय सहभागातून या अधिवेशनाची सखोल तयारी पूर्ण झाली आहे. साप्ताहिक संपादक असोसिएशन ही ठाणे/0000360/2023 या नोंदणी क्रमांकाने नोंदणीकृत असून पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक प्रगती, संघटनात्मक बळकटी आणि समाजाभिमुख पत्रकारिता यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 ते 11.00 या वेळेत नोंदणी व स्वागत चहाने होणार असून सकाळी 11.00 ते 11.15 या कालावधीत उद्घाटन सत्रात दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक होईल. त्यानंतर सकाळी 11.15 ते 11.30 या वेळेत उद्घाटनपर भाषणाद्वारे संपूर्ण अधिवेशनाचा उद्देश, भूमिका व अपेक्षित दिशा स्पष्ट केली जाणार आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत संपादक कार्यशाळा सत्र 1 अंतर्गत पत्रकारितेच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. मूलभूत पत्रकारिता व कौशल्य विकास या विषयावर प्रा. उत्तम भगत (बॅचलर ऑफ मास मीडिया प्रमुख, अभिनव कॉलेज, भाईंदर) पत्रकारितेची पायाभूत तत्त्वे, बातमी लेखन, संपादन कौशल्ये व नवोदित पत्रकारांसाठी आवश्यक व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील. डिजिटल तंत्रज्ञान आणि नवीन माध्यम या विषयावर प्रा. युवराज आर्य (डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोफेशनल, कन्सल्टंट) डिजिटल युगातील पत्रकारितेतील बदल, सोशल मीडिया, वेब पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर प्रकाश टाकतील. पत्रकारितेतील नैतिकता या विषयावर मनोज सानप (जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे तसेच प्र. उपसंचालक (माहिती), कोकण विभाग) पत्रकारांची सामाजिक जबाबदारी, आचारसंहिता आणि विश्वासार्हता यांचे महत्त्व विशद करतील. पत्रकारितेतील कायदे व नियम या विषयावर अॅड. स्मिता चिपळूणकर (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यम कायदेविषयक सल्लागार, राष्ट्रीय अध्यक्ष – जर्नलिस्ट्स असोसिएशन) माध्यमांशी संबंधित कायदे, पत्रकारांचे अधिकार व कर्तव्ये आणि कायदेशीर अडचणींबाबत मार्गदर्शन देतील. वैयक्तिक सोयीकडून वैश्विक सुसंवादाकडे या विषयावर विजयकुमार कट्टी (पर्यावरण मित्र) पत्रकारितेची व्यापक सामाजिक व पर्यावरणीय भूमिका अधोरेखित करतील. दुपारी 1.35 ते 2.45 या वेळेत संपादक कार्यशाळा सत्र 2 अंतर्गत राज्यस्तरीय साप्ताहिक संपादक अधिवेशन 2026 होणार असून यामध्ये राज्यभरातील साप्ताहिक संपादक, पत्रकार व माध्यम प्रतिनिधी सहभागी होऊन पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर, अडचणींवर व भविष्यातील दिशांवर सखोल विचारमंथन करतील. अनुभवांची देवाणघेवाण, संघटनात्मक बळकटी आणि एकत्रित धोरणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. कार्यक्रमाचा समारोप दुपारी 2.45 ते 2.55 या वेळेत होणार असून कार्यवाह, साप्ताहिक संपादक असोसिएशन यांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय कार्यशाळा व अधिवेशनामुळे साप्ताहिक पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, संपादकांचे ज्ञान व आत्मविश्वास वाढेल आणि समाजहितासाठी अधिक प्रभावी, जबाबदार व विश्वासार्ह पत्रकारिता घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






