आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निर्णायक हस्तक्षेपाने पाचोरा शेतकरी अनुदान प्रकरणात सातही मागण्या मंजूर; अंधारात पेटलेला न्यायाचा लढा निर्णायक वळणावर

0

Loading

पाचोरा – तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी अनुदान, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे शेतकरी वर्गात दीर्घकाळापासून तीव्र असंतोष साचत गेला होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी, पत्रव्यवहार झाले; मात्र कागदांवर हालचाल दिसली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही. काही प्रकरणांत अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न होता ती इतर व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले. गुन्हे दाखल होऊन न्यायालयात चार्जशीट सादर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने न्याय अजूनही अपुरा असल्याची भावना तीव्र होत गेली. या पार्श्वभूमीवर नाचणखेडा येथील शेतकरी गुलाब प्रताप पाटील यांनी सन २०१९ पासून पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार करत आमरण उपोषण सुरू केले. दिवसा प्रशासनाकडून चर्चा, बैठका व आश्वासनांची प्रक्रिया सुरू असतानाही रात्री अंधारात उपोषण सुरूच राहिले, ही बाब या आंदोलनाची तीव्रता आणि गांभीर्य अधोरेखित करणारी ठरली. या आंदोलनात शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणातील प्रमुख आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी सक्रिय भूमिका घेतली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून केवळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि लाक्षणिक आंदोलनासह प्रशासकीय पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला.उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुलाब प्रताप पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाचोरा नगरपालिकेचे शिक्षण सभापती व नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना संपूर्ण वस्तुस्थिती कळवली. माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने उपोषणस्थळी भेट दिली. प्रांताधिकारी भूषण अहिरे कार्यालयात उपलब्ध नसल्याने आमदारांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना दिल्या, त्यानंतर तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांना आवश्यक कागदपत्रांसह बोलावण्यात आले. उपोषणस्थळी झालेल्या बैठकीस गुलाब प्रताप पाटील, संदीप महाजन, सामाजिक कार्यकर्ते शिवरामदादा, उबाठा सेनेचे रमेश बाफना, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशबापू पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाप्रमुख सचिन सोमवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, माजी सैनिक किरण पाटील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सविस्तर साधक-बाधक चर्चेनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नारळपाणी देऊन गुलाब प्रताप पाटील यांचे आमरण उपोषण सोडवण्यात आले; मात्र हे उपोषण प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत स्थगित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेअंती शेतकऱ्यांच्या सातही मागण्या पूर्णतः मंजूर करण्यात आल्या. सन २०१९ ते आजपर्यंत अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची गावनिहाय व वर्षनिहाय सविस्तर यादी पीडीएफ स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी महसूल विभागाच्या अखत्यारीतील मुक्ताईनगर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी व कार्यवाही सुरू झाली आहे. चुकीच्या खात्यावर गेलेल्या रकमा, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंतची कार्यवाही यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू असून भविष्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदान मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. या संपूर्ण संघर्षातून इतिहास पुन्हा एकदा लिहिला जात असून, उपोषणाच्या वेळी काही हसत तमाशा पाहणारे, लेखण्या गहाण ठेवणारे आणि सुरक्षित अंतर राखणारे यांची नोंद वेगळी तर आग विझवण्यासाठी उभे राहणाऱ्यांची नोंद वेगळी राहणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागला असला तरी प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली असून आता हा लढा रस्त्यावर किंवा आंदोलन स्वरूपात राहणार नसून न्यायालय स्तरावर लढला जाणार असल्याचे संदीप महाजन यांनी स्पष्ट केले त्यामुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here