![]()
पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवाचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या समारोप समारंभात पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते व व्याख्याते अशोक देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरोगी, तणावमुक्त व सकारात्मक जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे विचार मांडले. आयुष्यात आनंदी व यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने खळखळून हसण्याची सवय लावली पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले. “माझा कोणी शत्रू नाही आणि मी कुणाचा शत्रू नाही” ही सकारात्मक वृत्ती मनाशी कायम बाळगल्यास जीवनातील अनेक अडथळे सहज पार करता येतात, असा संदेश त्यांनी दिला. दररोज सकाळी व संध्याकाळी किमान अर्धा तास चालणे, मनातल्या गोष्टी विश्वासू व्यक्तींशी मोकळेपणाने सांगणे, अपेक्षारहित व निर्व्यसनी जीवन जगणे यामुळे मनुष्य तणावमुक्त राहतो, नकारात्मक विचारांपासून दूर जातो आणि सकारात्मक कार्य त्याच्या हातून घडते, असे त्यांनी सांगितले. हे जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आत्मसात केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्हि. टी. जोशी होते. त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते, असे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भविष्यात यशस्वी होण्यासाठी सुदृढ मन, मस्तक आणि मनगट या तिन्हींच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचले पाहिजे. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यामुळे सकारात्मक मार्गाने आव्हानांना सामोरे जात स्पर्धेत उतरून यश मिळवावे आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी पै. हितेश अनिल पाटील यांनी बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 125 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील अनिल धना पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर ऋषिकेश लक्ष्मण चौधरी या विद्यार्थ्याची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित गीतगायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिमिक्री, डिश डेकोरेशन, नाटक आदी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयातील डॉ. छाया पाटील, डॉ. सुवर्णा पाटील व सपना रावते यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अतुल पाटील व सागर पाटील यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाल्याबद्दल, डॉ. शरद पाटील यांनी दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादर केल्याबद्दल, तसेच प्रा. वाय. बी. पुरी यांना असोसिएट प्राध्यापक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. जे. पी. बडगुजर यांची SQAAF कमिटीवर निवड झाल्याबद्दल व प्रा. किरण पाटील यांच्या वाणिज्य शाखेतील दोन क्रमिक पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दलही गौरव करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने वरिष्ठ महाविद्यालय विरुद्ध कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांची क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आली. या सामन्यात वरिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला. यानिमित्ताने वरिष्ठ महाविद्यालयाच्या विजयी संघाचे संघनायक प्रा. डॉ. माणिक पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे संघनायक प्रा. नितीन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. सुभाष तोतला, अण्णासाहेब दगाजी वाघ, डॉ. जयंतराव पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, आप्पासाहेब सतीश चौधरी, प्रकाश एकनाथ पाटील, योगेश दादा पाटील, आकाश वाघ, काकासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. सुनिता गुंजाळ, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव वले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माणिक पाटील, डॉ. अतुल सूर्यवंशी व प्रा. वैशाली बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. तडवी यांनी मानले. राष्ट्रगीताने या प्रेरणादायी समारोप समारंभाची सांगता झाली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





