![]()
पाचोरा – शहरातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये सध्या भोंगळ, विस्कळीत आणि नागरिकांना त्रासदायक ठरणारा कारभार उघडपणे दिसून येत आहे. शासकीय नियमांनुसार प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर स्पष्ट, वाचनीय व अद्ययावत नामफलक असणे, त्या फलकावर कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पदे व त्यांच्याकडे असलेले कामकाज नमूद असणे आवश्यक आहे. यासोबतच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टेबलावर त्यांची नेमकी ओळख पटेल अशी नावाची प्लेट अथवा ठोकळा असणे बंधनकारक आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ व त्यामधील जेवणाच्या सुट्टीचा कालावधी स्पष्टपणे नमूद असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आपले काम कोणाकडे आणि कोणत्या वेळेत करायचे आहे हे सहज समजू शकते. मात्र पाचोरा शहरातील बहुतेक शासकीय कार्यालयांत या मूलभूत नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर आवश्यक असलेले फलकच नसल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी फलक असले तरी त्यावरील माहिती अपुरी, जुनी किंवा अस्पष्ट स्वरूपाची आहे. अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पदे आणि त्यांच्याकडे असलेले कामकाज स्पष्टपणे नमूद नसल्यामुळे नागरिकांना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तासन्तास कार्यालयात भटकावे लागते. अनेक टेबलांवर नावाच्या प्लेट नसल्यामुळे समोर बसलेला अधिकारी किंवा कर्मचारी नेमका कोणत्या पदावर आहे हे कळत नाही आणि यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो. यामध्ये भर म्हणून पाचोरा शहरात शासकीय कार्यालयीन वेळेत एक नवी, चुकीची आणि अत्यंत आक्षेपार्ह प्रवृत्ती रुजू झाल्याचे दिसून येत आहे, ती म्हणजे निश्चित केलेल्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेऐवजी थेट कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच डबा खाणे. अनेक कार्यालयांमध्ये नागरिक सकाळपासून कामासाठी थांबलेले असताना अधिकारी किंवा कर्मचारी टेबलावर बसूनच जेवण करत असल्याचे दृश्य सामान्य झाले आहे. परिणामी कामकाज थांबते, नागरिकांना “थांबा”, “नंतर या”, “जेवण सुरू आहे” अशी उत्तरे दिली जातात आणि कार्यालयीन वेळ असूनही प्रत्यक्षात सेवा मिळत नाही. शासकीय सेवेत पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नामफलक, कामकाज फलक, टेबलवरील नावाच्या प्लेट्स, ओळखपत्रे तसेच निश्चित केलेल्या वेळेतच जेवणाची सुट्टी पाळणे या बाबी केवळ औपचारिकता नसून नागरिकाभिमुख प्रशासनाची मूलभूत तत्त्वे आहेत. कार्यालयीन वेळेत डबा खाण्याची सवय ही या तत्त्वांवर थेट आघात करणारी असून ती नागरिकांच्या वेळेचा, श्रमांचा आणि संयमाचा अपमान करणारी ठरते. याशिवाय ज्या विभागांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे त्या कार्यालयांतही त्याचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येते. गणवेश न परिधान केल्यामुळे नागरिकांना अधिकारी व कर्मचारी यांची ओळख पटत नाही. अनेक ठिकाणी गळ्यात ओळखपत्रे न लावल्याने ‘कोण अधिकारी आणि कोण कर्मचारी’ हा प्रश्न कायम राहतो. यामुळे गैरसमज, वादविवाद आणि कधी कधी अनावश्यक तणाव निर्माण होतो. या सर्व बाबींचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होत असून प्रमाणपत्रे, दाखले, नोंदी, तक्रारी, परवाने अशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व वेळेत सेवा मिळत नाही. परिणामी प्रशासनाबद्दल नाराजीची भावना वाढत असून शासकीय कार्यालयांविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. शासकीय कार्यालये ही जनतेची सेवा करणारी यंत्रणा असून ती लोकाभिमुख, शिस्तबद्ध आणि पारदर्शक असणे अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत नामफलकांचा अभाव, ओळखफलकांची कमतरता, ड्रेस कोड व ओळखपत्रांकडे होणारे दुर्लक्ष आणि कार्यालयीन वेळेत डबा खाण्याची वाढती प्रवृत्ती या अपेक्षांवर पाणी फेरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात तातडीने ‘नामफलक, ओळखफलक व शिस्तबद्ध कार्यालयीन वेळ पालन अभियान’ राबविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर नियमाप्रमाणे सुस्पष्ट व अद्ययावत फलक लावणे, प्रत्येक टेबलवर नावाची प्लेट बसवणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे गळ्यात लावणे, ड्रेस कोडचे काटेकोर पालन करणे, कार्यालयीन वेळा व जेवणाच्या सुट्टीचा कालावधी ठळकपणे दर्शविणे आणि निश्चित केलेल्या वेळेशिवाय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जेवणास सक्त मनाई करणे या बाबी प्राधान्याने अंमलात आणणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नियमित तपासणी व कठोर अंमलबजावणी केल्यासच या नियमांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. नागरिकांच्या सोयीसाठी असलेले हे नियम प्रत्यक्षात उतरले तर प्रशासनावरील विश्वास निश्चितच वाढेल, कामकाजात गती येईल आणि अनावश्यक गैरसमज व तणाव टळतील. त्यामुळे पाचोरा शहरातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्वरित सुधारणा करत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचे आदर्श उदाहरण निर्माण करणे ही काळाची नितांत गरज बनली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





