![]()
भडगाव – येथील येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व जीवनप्रवासासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. कु. लावण्या महाजन हिने सादर केलेल्या मधुर स्वागतगीताने संपूर्ण सभागृहात प्रसन्न व मंगल वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजयजी अहिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून भडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेशजी शर्मा, कवी प्रा. खुशालजी कांबळे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक बी. तायडे, यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक नितीन सोनजे तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख किरण पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. शरद पाटील यांनी सुस्पष्ट व प्रभावी शब्दांत करून दिला. प्रास्ताविक करताना उपप्राचार्य संदीप सोनवणे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक शिस्त, कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत होणाऱ्या परीक्षा, शिक्षासूची व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध सूचनांची माहिती दिली तसेच महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम मांडले. प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक महेशजी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात ध्येय निश्चित करून योग्य दिशेने सातत्याने वाटचाल करण्याचा सल्ला दिला व शिस्त, कष्ट आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट केले. कवी प्रा. खुशालजी कांबळे यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन करत अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश दिला. शिक्षक मनोगतातून प्रा. रेखा कोसोदे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत शिक्षक, प्राध्यापक आणि महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य अजयजी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत येणाऱ्या काळात अधिक अभ्यास करून यश संपादन करा व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा असे प्रेरणादायी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुयोग झंवर यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनिल पाटील यांनी मानले. निरोप समारंभाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





