शिक्षकांच्या मैत्री, क्रीडावृत्ती व एकोप्याचा उत्सव : पाचोऱ्यात ‘शिक्षक क्रिकेट चषक–२०२६’चे आयोजन

0

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा जि. जळगांव यांच्या वतीने शिक्षकांमधील क्रीडावृत्ती, मैत्रीभाव आणि मानसिक विरंगुळा जोपासण्यासाठी ‘शिक्षक क्रिकेट चषक–२०२६’ या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा–भडगांव तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत खेळाच्या माध्यमातून स्नेह, सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवावी, या उद्देशाने या स्पर्धेचे पर्व तिसऱ्यांदा आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांवर मोठा ताण येतो. दैनंदिन कार्यातून मिळणाऱ्या विरंगुळ्याचा आरोग्यदायी मार्ग म्हणजे खेळ. याच विचारातून ‘कार्यातून मिळावा विरंगुळा, छंद आपला जपूया’ या संदेशासह शिक्षक क्रिकेट चषकाची संकल्पना राबविण्यात येत आहे. क्रिकेटप्रेमी शिक्षकांना त्यांच्या खेळीचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, मैत्रीभाव अधिक दृढ व्हावा आणि शिक्षकांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य आशय आहे. ही तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा दिनांक २४ जानेवारी २०२६ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत एस. एस. एम.एम. कॉलेज मैदान, पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता होणार असून, अंतिम सामना व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा येथील मा. अध्यक्ष, मा. चेअरमन, मा. मानद चिटणीस, मा. व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू शिक्षकांचा उत्साह निश्चितच द्विगुणित होणार आहे. या शिक्षक क्रिकेट स्पर्धेमुळे शिक्षकांमधील आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रायोजक म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, पाचोरा तर आयोजक म्हणून टिचर्स क्रिकेट क्लब, पाचोरा ही जबाबदारी सांभाळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here