![]()
जळगाव (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी, अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेणारी आणि ग्रामीण पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख निर्माण केलेली गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र स्तरावरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर केली जाणार असून, संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी दिशा ठरविण्यात येणार आहे. ही बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी तसेच पत्रकारितेतील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, त्यांच्या प्रश्नांना एकसंघ आवाज देणे आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण आखणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. ही बैठक रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्यासह केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, केंद्रीय खजिनदार ललित खरे, तसेच केंद्रीय सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी, जोशीला पगारिया आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात सध्या वाढत असलेले दबाव, पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे, माहिती संकलनात येणाऱ्या अडचणी, तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. केवळ पदनियुक्तीपुरती मर्यादित न राहता, संघटनेच्या भावी कार्यपद्धती, आंदोलनात्मक धोरणे, संघटन विस्तार आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावी लढा कसा उभारता येईल, याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत. गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ही संघटना स्थापनेपासूनच निर्भीड भूमिका, स्पष्ट मांडणी आणि पत्रकार बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यामुळे ओळखली जाते. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्र व जिल्हास्तरावरील नव्या नेतृत्वाच्या निवडीकडे संपूर्ण पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह परिसरातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकारांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेची एकजूट, ताकद आणि पत्रकारितेच्या मूल्यांप्रती असलेली निष्ठा दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





