![]()
सुरत – भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यातील होमगार्डस्, सिव्हिल डिफेन्स व ग्राम रक्षक दलामध्ये उत्कृष्ट, निःस्वार्थ व राष्ट्रहिताची सेवा बजावणाऱ्या अधिकारी व जवानांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. या गौरवप्राप्त यादीत महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावचे सुपुत्र गणेश तुकाराम पाटील यांचा समावेश झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. महानिदेशक नागरी संरक्षण व होमगार्डस् तसेच पदसिद्ध कमांडंट जनरल होमगार्डस् गुजरात राज्य यांच्या कार्यालयामार्फत याबाबत अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले असून प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी व जवानांची राष्ट्रपती होमगार्डस् पदकासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीत सूरत जिल्ह्यात समूह-चौक होमगार्ड संरक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश तुकाराम पाटील यांची निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असलेले गणेश तुकाराम पाटील सध्या गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात होमगार्ड सेवेत कार्यरत असून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमा, नागरिकांमध्ये जनजागृती तसेच प्रशासनाला दिलेले सहकार्य या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यात शिस्त, सेवाभाव, सातत्य आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने दिसून येत असल्याने त्यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे आपत्ती प्रसंगी नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांनाही हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती होमगार्डस् पदक हा नागरी संरक्षण व स्वयंसेवी सुरक्षा व्यवस्थेतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. या सन्मानामुळे संबंधित अधिकारी व जवानांचे मनोबल वाढतेच, तसेच समाजातील तरुणांना राष्ट्रसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वयंसेवी सुरक्षादलात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने दुसऱ्या राज्यात सेवा बजावत प्रजासत्ताक दिनानिमित्त देशपातळीवरील सन्मान प्राप्त करणे ही बाब निश्चितच प्रेरणादायी असून गणेश तुकाराम पाटील यांच्या या यशाबद्दल तारखेडा गाव, पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढल्याची भावना व्यक्त होत असून प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र निमित्ताने अशा सेवाभावी, शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना सन्मानित करून शासनाने नागरी संरक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





