![]()
पाचोरा – तालुक्यातील वडगाव (टेक) बु. प्र. पा. ग्रामपंचायतीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज सूर्यास्ताआधीच उतरवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह वरिष्ठ व तालुका स्तरावरील संबधितांकडे ई-मेल, वॅटसॲपव्हारे तक्रार करण्यात आली आहे. संदीप दा. महाजन यांनी याबाबत सविस्तर तक्रार सादर केली असली तरी एवढी महत्वपूर्ण राष्ट्रध्वजा संदर्भात घटना घडल्या नंतर सोशल मीडियावर सदरची वृत्त प्रसारित होताच स्थानिक शासकीय यंत्रणेने यासंदर्भात कोणाच्याही तक्रारीची वाट न पाहता गंभीर दखल घेणे महत्त्वपूर्ण होते या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दि. 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, वडगाव (टेक) येथील ग्रामपंचायत कार्यालयावरही राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. मात्र तो राष्ट्रध्वज आचार संहिते नुसार राष्ट्रध्वज हा सूर्यास्तापर्यंत फडकवणे बंधनकारक असताना, संबंधित ठिकाणी राष्ट्रध्वज सूर्यास्त होण्यापूर्वीच उतरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार केवळ नियमभंगाचाच नव्हे, तर राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला तडा देणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, संबंधित ग्रामसेवक हे नियुक्तीच्या ठिकाणी हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि त्यातून झालेला हा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे निर्देश करणारा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि सन्मानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम अंतर्गत राष्ट्रध्वजाचा अवमान किंवा त्यासंबंधी नियमांचे उल्लंघन हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात. त्यामुळे सदर प्रकरण केवळ प्रशासकीय चूक म्हणून दुर्लक्षित न करता, त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर वडगाव (टेक) परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत प्रशासनाने दाखवलेली निष्काळजी भूमिका चिंताजनक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. “राष्ट्रीय सण हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, तो देशप्रेम आणि संविधानावरील निष्ठेचे प्रतीक आहे. अशा दिवशी नियमांचे पालन न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तक्रारदार संदीप दा. महाजन यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह वरीष्ठ स्तरावर व तालुका स्तरावर सदर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून, दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन योग्य ती प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. तसेच या तक्रारीसोबत घटनेशी संबंधित गुगल मॅप फोटोही जोडण्यात आले असून, त्यामुळे प्रकरणाची सत्यता अधिक ठळकपणे समोर येत आहे.विशेष म्हणजे सदरचे वृत्त प्रसार माध्यमांमधून 4.30 वाजता प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर तालुकास्तरावरील संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देणे अत्यावश्य होते त्यांची देखील स्थानीक स्तरावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौकशी होऊन त्यांना सह आरोपी करण्यात यावे असेही तक्रारदार संदीप महाजन यांनी म्हटले आहे जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे कोणत्या प्रकारे पाहते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंधित अशा घटनांवर कठोर भूमिका घेतली गेली, तरच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती रोखता येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





