![]()
पाचोरा– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांनी भारून गेला होता. या सोहळ्यास शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल अठराशे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताच्या तालावर सादर केलेली सांघिक कवायत हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शिस्त, समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही कवायत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यासोबतच डंबेल्स, घुंगरू काठी व करले यांच्या कवायतींनी कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. विद्यार्थ्यांच्या काटेकोर हालचाली, शिस्तबद्ध मांडणी आणि तालबद्ध सादरीकरणातून त्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील शिस्तप्रिय संस्कार प्रकर्षाने जाणवत होते. स्काऊट गाईड पथकाने सादर केलेले पथ संचलन हे देखील कार्यक्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. या पथ संचलनातून शिस्त, देशसेवा आणि नेतृत्वगुणांचे उत्तम दर्शन घडले. कार्यक्रमादरम्यान संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण अधिकच भारावून टाकले. श्रद्धा सोनवणे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांची मने जिंकून घेतली. तिच्या प्रभावी आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी तिला उत्स्फूर्त दाद दिली. याचप्रसंगी भाग्यश्री खरे या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, संविधानाचे मूल्य आणि तरुणांची जबाबदारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तिच्या विचारप्रवर्तक भाषणाने विद्यार्थ्यांना देशप्रेम, कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शाळेने विद्यार्थ्यांप्रती आपुलकी आणि समतेचा संदेश दिला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेचे संचालक सतीश चौधरी, शशिकांत चंदिले, डॉ. अमोल जाधव, डॉ. नरेश गवांदे, माजी मुख्याध्यापक सुधीर पाटील, माजी पर्यवेक्षक पी.जे. पाटील, शांताराम चौधरी, ए.जे. महाजन, माजी तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. पाटील (ठाकरे), पर्यवेक्षक सौ. ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीत आणि राज्यगीत सागर थोरात व रुपेश पाटील यांनी सादर केले. संगीत कवायतीसाठी संजय करंदे, महेश चिंचोले, संदीप मनोरे यांनी उत्कृष्ट संचलन केले तर स्काऊट गाईड पथक संचालनासाठी आर.बी. कोळी, अमित नागरगोजे, शुभम पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आर.बी. बोरसे यांनी केले. या सोहळ्यास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, शिस्त, संस्कार, देशभक्ती आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





