श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त पाचोरात भक्तिभावात भव्य धार्मिक-सामाजिक उत्सव व मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

0

Loading

पाचोरा – सृष्टीचे आद्य शिल्पकार व देवशिल्पी भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक व सामाजिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, पाचोरा, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, पाचोरा तसेच श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवाने शहरात धार्मिकता, सामाजिक एकता आणि श्रमसंस्कृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. सकाळपासूनच नंदनवन सिटी जवळ, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा येथील नियोजित भगवान श्री विश्वकर्मा मंदिराच्या जागेवर भाविकांची मोठी गर्दी जमू लागली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता महाआरती व विधीवत पूजनाने झाली. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या वातावरणात भगवान श्री विश्वकर्मा यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला भूमिपूजन सोहळा पार पडला. हा ऐतिहासिक भूमिपूजन समारंभ आप्पासो. किशोर धनसिंग पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी मंदिर उभारणीच्या दिशेने एक ठोस आणि ऐतिहासिक पाऊल टाकले गेले असून भविष्यात हे मंदिर पाचोरा शहरातील एक प्रमुख श्रद्धास्थान ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी व मान्यवर म्हणून किशोर गुणवंतराव बारवकर (उपनगराध्यक्ष, नगरपालिका पाचोरा), अॅड. दादासो. अविनाश देविदास सुतार (नगरसेवक, नगरपालिका पाचोरा) तसेच दादासो. अपूर्व अजय थेंडे (थेंडे बिल्डर्स, पाचोरा) यांची उपस्थिती लाभली. तसेच भूमिपूजन समारंभ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे नगरपालिका सभागृहाचे गटनेते नगरसेवक सुरजदादा वाघ आणि नगरसेवक अविनाश सुतार ,शिवसेना युवासेनेचे शहरअध्यक्ष सुरज उर्फ भावडू शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास सामाजिक, सार्वजनिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या संपूर्ण उत्सवात समस्त विश्वकर्मीय समाज बांधव, भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भगवान श्री विश्वकर्मा हे सृष्टीचे रचयिता, श्रमसंस्कृतीचे प्रतीक आणि कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील एकता, सेवा, कौशल्य आणि सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या भावी उभारणीसाठी प्रेरणा घेतली. कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या महाप्रसादाच्या माध्यमातून समता, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावात पार पडल्याबद्दल आयोजकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने पाचोरा शहरात धार्मिकतेसह सामाजिक बांधिलकी अधिक बळकट झाली असून भविष्यात उभारल्या जाणाऱ्या भगवान श्री विश्वकर्मा मंदिरामुळे समाजाला एकत्र आणणारे आणि श्रद्धेचे केंद्र निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे, मान्यवरांचे आणि नागरिकांचे आयोजक संस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here