![]()
पाचोरा – बहुजनहिताय, बहुजनसुखाय या ब्रीदवाक्याला अनुसरून प्रसार भारती अंतर्गत कार्यरत असलेल्या आकाशवाणी जळगाव केंद्रावर श्रोत्यांसाठी नेहमीच समाजोपयोगी, सकारात्मक आणि मार्गदर्शक कार्यक्रम सादर केले जातात. याच परंपरेचा भाग म्हणून आकाशवाणी जळगाववरील ‘स्पंदन’ या विशेष कार्यक्रमात वृत्त आणि व्यक्तींच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा, मानसिक संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैली या विषयांवर आधारित एक महत्त्वपूर्ण मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात रेकी आचार्य प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) यांची विशेष मुलाखत घेण्यात येणार असून ही मुलाखत वैदेही नाखरे यांनी घेतलेली आहे. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा, मानसिक अस्वस्थतेवर कशी मात करावी, तसेच तणावमुक्त आणि संतुलित जीवनशैली कशी अंगीकारावी, याबाबत प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती मानसिक तणाव, चिंता, नैराश्य आणि अस्वस्थतेला सामोरी जात आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि सततची धावपळ यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत अंतर्मुख होणे, स्वतःशी संवाद साधणे आणि सकारात्मक ऊर्जेचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत त्या व्यक्त करणार आहेत. रेकी ही केवळ उपचारपद्धती नसून ती एक जीवनशैली असल्याचे त्या सांगणार आहेत. औषधांशिवाय, नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य मिळवणे शक्य आहे. रेकीच्या सरावामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात, आत्मशक्ती जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनते, याविषयी त्या सोप्या आणि सहज शब्दांत माहिती देणार आहेत. या मुलाखतीत त्या आपल्या वैयक्तिक अनुभवांद्वारे रेकीचा उपयोग कसा करता येतो, दैनंदिन जीवनात मानसिक संतुलन कसे राखता येते, तसेच तरुण पिढीने तणावमुक्त जीवनासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, यावर विशेष भर देणार आहेत. विशेषतः आजच्या तरुणांमध्ये वाढत चाललेल्या तणाव, अपयशाची भीती आणि अस्थिरतेवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक ऊर्जा किती आवश्यक आहे, हे त्या अधोरेखित करणार आहेत. प्राध्यापिका जयश्री कोमल वाघ (वर्मा) या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक मधुकरअण्णा ओंकार वाघ यांच्या स्नुषा असून श्री गो से हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. प्रमिला मधुकर वाघ यांची सून आहेत. तसेच त्या कोमल मधुकर वाघ यांची पत्नी आहेत. संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जाणिवांनी समृद्ध असलेल्या या कुटुंबातील मूल्यांचा त्यांच्या विचारसरणीवर आणि कार्यावर मोठा प्रभाव असल्याचे या संवादातून स्पष्ट होणार आहे. ही मुलाखत केवळ माहितीपर न राहता श्रोत्यांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारी ठरणार आहे. सकारात्मक ऊर्जा म्हणजे केवळ संकल्पना नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यास जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो, हा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. ‘स्पंदन’ कार्यक्रमाचे सादरीकरण विजय भुयार करणार असून हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. सदर कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्रावर १०२.१ एफएमवर तसेच newsonair या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. सकारात्मक विचार, मानसिक आरोग्य आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणारा हा ‘स्पंदन’ कार्यक्रम श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






