पार्थ राजपूतचा रोलर स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम; धुळ्यात ऐतिहासिक कामगिरी

0

Loading

धुळे – जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व प्रिन्स रोलर स्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी रोजी कमलाबाई कन्या हायस्कूल, धुळे येथे वर्ल्ड रेकॉर्ड कॉम्पिटिशन व एज ग्रुप कॉम्पिटिशनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील बाल खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले धुळे येथील रहिवासी बाल खेळाडू पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने केलेली ऐतिहासिक कामगिरी. पार्थ मनमोहनसिंग राजपूत हा पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी, माजी जळगाव जिल्हा परिषद सदस्य पदमबापू पाटील यांची कन्या सौ. मोनिका मनमोहनसिंग राजपूत व सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर मनमोहनसिंग विजयसिंग राजपूत यांचा सुपुत्र असून, तसेच तो पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी व माजी जळगाव जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग राजपूत यांचा नातू आहे. पार्थचा हा सामाजिक, कौटुंबिक व राजकीय पार्श्वभूमीशी असलेला संबंध त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक बळ देणारा ठरत असून, कुटुंबातील शिस्त, संस्कार व क्रीडाप्रेमाची परंपरा त्याच्या यशामागे ठळकपणे दिसून येते. या स्पर्धेत पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने स्केटिंग मॅरेथॉन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या लहान वयात पार्थने एक तास २६ मिनिटे २६ सेकंद असा विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे धुळे जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. स्पर्धेदरम्यान पार्थने दाखवलेली एकाग्रता, चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्ती उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. सलग दीर्घकाळ स्केटिंग करताना आवश्यक असलेले संतुलन, वेग आणि सहनशक्ती यांचे उत्कृष्ट दर्शन त्याच्या कामगिरीतून घडले. एवढ्या कमी वयातही कोणताही थकवा न दाखवता त्याने संपूर्ण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे परीक्षकांनीही त्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत त्याला प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरवले. पार्थला या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा तसेच संपूर्ण कुटुंबाचा मोठा पाठिंबा लाभला आहे. वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून पार्थने खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यास सुरुवात केली असून, नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य मार्गदर्शनामुळे त्याची प्रगती सातत्याने होत आहे. सौ. मोनिका मनमोहनसिंग राजपूत व मनमोहनसिंग विजयसिंग राजपूत यांनी मुलाच्या क्रीडागुणांना ओळखून त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले आहे. सरावासाठी वेळ देणे, आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, तसेच विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देणे ही भूमिका त्यांनी कायम सकारात्मकपणे निभावली आहे. याच कौटुंबिक पाठबळाचा परिपाक आजच्या या जागतिक विक्रमाच्या रूपाने सर्वांसमोर आला आहे. या दैदीप्यमान यशामध्ये पार्थला मार्गदर्शक अर्थात कोच म्हणून धनंजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कोच धनंजय पाटील यांनी पार्थच्या कौशल्याला योग्य दिशा देत त्याच्या तांत्रिक क्षमतेवर विशेष भर दिला असून, सातत्यपूर्ण सराव, योग्य फिटनेस ट्रेनिंग, मानसिक तयारी आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज या जागतिक विक्रमातून स्पष्टपणे दिसून येत आहे. पार्थ मनमोहनसिंग राजपूत याने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून अनेक वेळा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर यापूर्वीच गिनिश बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड अमेरिका बुक रेकॉर्ड या तीनही बुक रेकॉर्डमध्ये भारतीय सहभागाची नोंद आहे. या विक्रमांमुळे तो देशपातळीवर ओळखला जाऊ लागला असून, धुळे जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाला अभिमान वाटावा अशी त्याची वाटचाल सुरू आहे. या स्पर्धेत सहा ते आठ वयोगटातील खेळाडूंसाठी विशेष गट ठेवण्यात आला होता. या गटात पार्थने सुवर्णपदक व आकर्षक ट्रॉफी पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. पारितोषिक वितरण समारंभात धुळे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व धुळे जिल्हा स्केटिंग परिवाराच्या वतीने पार्थचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आयोजकांनी त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करत, अशीच मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम ठेवण्याचा सल्ला दिला. स्पर्धेच्या निमित्ताने धुळे शहरात क्रीडाप्रेमी वातावरण निर्माण झाले होते. पालक, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः एवढ्या कमी वयात जागतिक विक्रम करणाऱ्या पार्थच्या कामगिरीने अनेक पालकांना आपल्या मुलांना खेळांकडे वळवण्याची आणि प्रोत्साहन देण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. धुळ्यातील हा कमी वयाचा खेळाडू सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. पार्थच्या या दैदीप्यमान यशाबद्दल झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांच्यातर्फे त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here