एस. एस. एम. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांतून शिवविचारांचे जतन आणि इतिहासाला उजाळा

0

Loading

वरखेडी ( कु. चेतना हिरे ) पाचोरा येथील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ आणि संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच प्रसंगी इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतून आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून साकारलेले हे प्रदर्शन शिवकालीन इतिहासाचे जिवंत दर्शन घडवणारे ठरले. विविध किल्ल्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक आणि लष्करी महत्त्व पोस्टर व प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. मार्गदर्शनपर भाषणात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी पैलूंवर सखोल प्रकाश टाकला. लढाऊपणा, सूक्ष्म नियोजन, संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती, योग्य नियोजनाच्या आधारे प्रत्येक आव्हानावर मात करण्याची क्षमता हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ ज्ञान नव्हे तर मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा व गडकिल्ले प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन विविध प्रसंगांचे कलात्मक रेखाटन सादर केले. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांचे दर्शन, तसेच स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण पाहून उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ इतिहासाची पुनरावृत्ती न करता त्यातील मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनीही आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. शिक्षणसंस्थांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, कर्तव्यभावना आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवावी, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. महेंद्र महाजन, डॉ. सुनीता गुंजाळ, डॉ. अतुल सूर्यवंशी, प्रा. ललित वाघ, श्री. ऋषिकेश ठाकूर, प्रा. महेश माळी, प्रा. स्वप्नील ठाकरे, प्रा. ललित पाटील, प्रा. डी. एस. पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी प्रभावीपणे केले. पोस्टर व रांगोळी स्पर्धेची संकल्पना इतिहास विभागातील प्रा. डॉ. माणिक पाटील यांची होती. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध आयोजन, अभ्यासपूर्ण मांडणी आणि उत्स्फूर्त सहभाग यांचा सुंदर संगम दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाबद्दल अभिमान आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा जागवणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here