Home Dhyeya News Special पावसाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात साप दिसणे नित्याचे; नियमित स्वच्छतेतून नागरिकांच्या...

पावसाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात साप दिसणे नित्याचे; नियमित स्वच्छतेतून नागरिकांच्या सुरक्षिततेला मिळू शकते बळ

0
37

Loading

पाचोरा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर हा पंचक्रोशीतील प्रमुख धान्य आणि भाजीपाला बाजार म्हणून ओळखला जातो. दररोज मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत येथे शेतकरी, व्यापारी, हमाल, वाहनचालक, भाजीपाला विक्रेते आणि खरेदीदारांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा या गजबजलेल्या परिसरात पावसाळा सुरू होताच साप दिसणे नित्याचे झाले असून, दिवसातून किमान एकदा तरी साप नजरेस पडत असल्याचे स्थानिक व्यापारी व नागरिक सांगत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सापांच्या नैसर्गिक बिळांमध्ये पाणी शिरत आहे. स्वतःच्या निवासस्थानातच पाणी साचल्यामुळे सापांना सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडावे लागत असून ते धान्य बाजार, भाजीपाला मार्केट, गटारीलगत तसेच झुडपांच्या परिसरात दिसून येत आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात अशी परिस्थिती नैसर्गिक असते आणि याच काळात सापांचा वावर तुलनेने वाढलेला आढळतो. धान्य बाजारात मोठ्या प्रमाणावर धान्याची आवक-जावक होत असल्याने उंदरांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. उंदीर हे सापांचे प्रमुख भक्ष असल्यामुळे अशा परिसरात साप येणे स्वाभाविक मानले जाते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अधूनमधून साप दिसणे ही नवीन बाब नसली, तरी पावसाळ्यात त्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. दिनांक ४ ऑगस्ट रोजी पहाटे एका भल्या मोठ्या सापाचे दर्शन झाल्यानंतर आज दिनांक 5 ऑगष्ट रोजी पुन्हा दिसून आला तरी या विषयाकडे

पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विशेष म्हणजे आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अथवा परिसरात साप चावल्याची कोणतीही घटना घडलेली नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तरीदेखील भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सतर्कता आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दररोज पहाटेपासून भाजीपाला मार्केटमध्ये शेकडो शेतकरी, व्यापारी, महिला विक्रेते, ग्राहक आणि मजूर यांची मोठी लगबग सुरू असते. मालाची चढ-उतार, वाहनांची ये-जा आणि काही ठिकाणी अंधाराचे वातावरण असल्याने साप अचानक समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पायाखाली लक्ष ठेवून चालणे, आवश्यकतेनुसार टॉर्चचा वापर करणे आणि झुडपे किंवा गटारीलगत अनावश्यक वावर टाळणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या आवारातील झुडपे, गवत, पालापाचोळा आणि कचरा यांची नियमित स्वच्छता ठेवणे, तसेच नगरपालिका प्रशासनाने बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या गटारींची सातत्याने साफसफाई करून परिसर स्वच्छ आणि मोकळा ठेवणे पुरेशी विद्युत रोषणाई ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. स्वच्छ परिसरामुळे सापांना लपण्यासाठी अनुकूल जागा कमी मिळते आणि नागरिकांनाही सुरक्षितपणे वावरता येते. साप दिसल्यास घाबरून जाऊन त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता संबंधित यंत्रणेला किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती देणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. साप हे पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर हा हजारो शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांचे प्रमुख केंद्र असल्याने नियमित स्वच्छता, गटारींची देखभाल, झुडपे हटविणे, नागरिकांमध्ये जनजागृती आणि आवश्यक ती खबरदारी या उपाययोजनांमुळे परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि भयमुक्त राहण्यास निश्चितच मदत होईल. पावसाळ्यात सापांचा नैसर्गिक वावर लक्षात घेता प्रशासन आणि नागरिक यांनी समन्वयाने कार्य केल्यास कोणतीही अप्रिय घटना टाळणे सहज शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!