गॅस दरवाढीविरोधात पाचोरा काँग्रेसचा संताप; काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाला इशारा

0

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जगणे अधिकच कठीण होत असताना, त्यातच गॅसचा काळाबाजार फोफावत असल्याच्या तक्रारींनी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला ठोस कारवाईचा इशारा दिला आहे. या संदर्भात तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पाचोरा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांकडून जादा दर आकारले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सर्वसामान्य कुटुंबांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. याशिवाय, केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या गॅस दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या सूचनेनुसार पाचोरा तालुका काँग्रेसने या प्रश्नावर आंदोलन उभारले. या आंदोलनाद्वारे गॅस वितरण व्यवस्थेतील अनियमितता व काळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातील गॅस हा जीवनावश्यक घटक आहे. त्यावर होणारी अन्यायकारक दरवाढ आणि काळाबाजार ही बाब सहन केली जाणार नाही. प्रशासनाने त्वरित छापेमारी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” जिल्हा चिटणीस शेख इरफान शेख मन्यार यांनी देखील या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “गॅस एजन्सी आणि काही दलालांच्या संगनमतामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहून पारदर्शक वितरण प्रणाली सुनिश्चित करणे आवश्यक आहे.” अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, युवक काँग्रेसचे संदीप पाटील, एस.सी. सेलचे शंकर सोनवणे, प्रवीण पाटील, अण्णा पाटील तसेच ओबीसी सेलचे चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, प्रशांत पाटील, राहुल मराठे, दिलदार पठाण आदी पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली. दरम्यान, तहसीलदार विजय बनसोडे यांनी निवेदन स्वीकारत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांना योग्य दरात गॅस मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे पाचोरा तालुक्यात गॅस दरवाढ व काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here