![]()
एरंडोल – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडकी बु. येथील रहिवासी विवाहित शशिकांत सुरेश चौधरी (वय 39) हे दि. 25 डिसेंबर 2023 पासून बेपत्ता असून तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात बेपत्ता नोंद करण्यात आलेली असतानाही तपासाची गती मंद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. शशिकांत सुरेश चौधरी हे किराणा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. विशेषतः त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांची अवस्था अत्यंत हालाखीची झाली असून, दोन वर्षे उलटूनही कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. या घटनेनंतर त्यांच्या लहान भावाने नंदलाल सुरेश चौधरी तसेच इतर नातेवाईक, शेजारी, आप्तजन आणि मित्रपरिवार यांनी वैयक्तिक स्तरावर मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. परिसरातील गावांमध्ये, नातेवाईकांकडे, तसेच विविध ठिकाणी चौकशी करूनही शशिकांत यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. यामुळे या प्रकरणात अधिक गंभीरपणे तपास होण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बेपत्ता झालेल्या शशिकांत सुरेश चौधरी यांचे वर्णन असे आहे की, त्यांची उंची सुमारे पाच फूट तीन इंच असून ते गौरवर्णीय व सडपातळ बांध्याचे आहेत. त्यांच्या या शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे कुणाला ते आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. दरम्यान, दोन वर्षे उलटूनही बेपत्ता व्यक्तीचा शोध न लागणे ही गंभीर बाब मानली जात असून पोलिस प्रशासनाच्या तपास पद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी सखोल आणि वेगवान तपास करून शशिकांत चौधरी यांचा शोध लावावा, अशी मागणी कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून होत आहे. कुणाला शशिकांत सुरेश चौधरी यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे – 9579089473 / 9226646717.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































