![]()
पाचोरा – राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आल्यानंतर आता सर्वाधिक उत्सुकता ज्या काही जागांबाबत निर्माण झाली आहे, त्यामध्ये जळगाव जिल्ह्याची जागा अग्रक्रमावर असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या या महत्त्वाच्या जागेसाठी पक्षामध्ये अनेक इच्छुक सक्रिय झाले असून, नेमका उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व भाजपचे चंदूभाई पटेल यांनी केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार याकडे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या प्राथमिक चर्चेनुसार विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याची जागा भाजपच्या खात्यात निश्चित मानली जात असली तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी संघटनात्मक ताकद, पक्षनिष्ठा, आर्थिक क्षमता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध या सर्व गोष्टी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यात भाजपामध्ये काही नावे चर्चेत असली तरी पाचोरा येथील अमोलभाऊ शिंदे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक रंगताना दिसत आहे. पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय राहून त्यांनी केलेले काम, कार्यकर्त्यांमध्ये असलेली त्यांची ओळख आणि कठीण राजकीय परिस्थितीत पक्षासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांच्या नावाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याची चर्चा आहे. विशेषतः नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी आणि त्यांचे स्नेही सिद्धांत यांनी केलेले राजकीय व्यवस्थापन व पडद्यामागील समन्वय याचा उल्लेख भाजपातील काही पदाधिकारी आवर्जून करत आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत काही जागांवर भाजपची परिस्थिती अत्यंत कठीण मानली जात होती. अनेक राजकीय समीकरणे विरोधात असताना त्या ठिकाणी भाजपाला अनपेक्षित यश मिळवून देण्यासाठी अमोलभाऊ शिंदे आणि सिद्धांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षाने जर यावेळी केवळ आर्थिक निकष न पाहता संघटनासाठी झटणाऱ्या आणि प्रत्यक्ष निवडणुकीत उपयोगी पडलेल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला, तर अमोलभाऊ शिंदे यांच्यासह सिद्धांत पाटील यांचे नाव देखील अंतिम चर्चेत येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विधान परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांवर आधारित असल्यामुळे येथे आर्थिक समीकरणे, राजकीय संपर्क, गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यांना देखील मोठे महत्त्व असते. त्यामुळे पक्षासमोर खरी कसोटी ही निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यायची की निवडणूक जिंकण्याची खात्री देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराला मैदानात उतरवायचे, अशी निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची जळगाव विधान परिषदेची ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील भविष्यातील राजकीय संबंधांची दिशा देखील या निवडणुकीतून स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील समन्वय, स्थानिक पातळीवरील सहकार्य आणि जागावाटपाबाबतचा विश्वास कितपत टिकून आहे, याची पहिली मोठी चाचणी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीचा निकाल आणि त्याआधीची राजकीय भूमिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती कायम राहणार की स्वतंत्र राजकीय वाटचाल होणार, याचे संकेत देणारी ठरणार असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय जाणकारांच्या मते, विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली तर महायुतीतील एकोपा आणि समन्वय अधिक मजबूत झाल्याचे चित्र राज्यभर जाईल. मात्र जर निवडणूक मतदानाद्वारे झाली आणि अनेक उमेदवार मैदानात उतरले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांभोवती सुरू होणाऱ्या हालचालींमुळे वातावरण अधिकच रंगणार आहे. अशा निवडणुकांमध्ये मतांसाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक हालचाली होत असल्याचे वास्तव उघड गुपित मानले जाते. त्यामुळे यावेळीही मतदानाची वेळ आली तर विविध स्तरांवर समीकरणे बदलताना दिसू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणात जळगाव जिल्ह्याच्या उमेदवारीबाबत अंतिम शब्द कोणाचा असेल, याबाबतही अनेकांच्या नजरा संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे लागल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील भाजप संघटनेवर त्यांची असलेली मजबूत पकड, निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि पक्षश्रेष्ठींशी असलेले थेट संबंध यामुळे जळगावच्या उमेदवारीत त्यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश इच्छुक देखील अप्रत्यक्षपणे गिरीशभाऊ महाजन यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांमध्येही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून भरत गोगावले यांनी आपल्या सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचवेळी सुनील तटकरे हे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याने कोकणातील जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, यवतमाळ यांसारख्या मतदारसंघांमध्येही इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आगामी काही दिवसांत महायुतीतील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असून १ जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी पडद्यामागील हालचालींना वेग दिला आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप कोणाला उमेदवारी देते, यावर केवळ एका जागेचे राजकारण ठरणार नाही तर भविष्यातील जिल्हा पातळीवरील नेतृत्वाची दिशा देखील निश्चित होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































