![]()
पाचोरा : धनदाई प्लॉट योजना प्रकरणातील प्लॉटधारकांच्या न्यायहक्कासाठी पुढील कायदेशीर लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा येथे धनदाई प्लॉटधारकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेखर उर्फ भोला पाटील (Mo.9096416815 ) यांच्याकडे संबंधित ग्राहकांनी आपल्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांच्या छायांकित प्रती जमा केल्या होत्या. त्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संदीप महाजन ( Mo.73 8510 8510 , 7588645907 उपस्थित होते. यावेळी धनदाई प्लॉट योजनेत प्लॉट बुकिंग केलेल्या अनेक ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. बैठकीत दोन विधीतज्ज्ञांनी उपस्थित ग्राहकांना सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन करत उपलब्ध पुराव्यांचे महत्त्व, न्यायालयीन प्रक्रिया, पोलीस तक्रार, महसूल विभागाकडे अर्ज तसेच ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या विविध कायदेशीर पर्यायांची माहिती दिली. यावेळी प्लॉटधारकांनी आपल्याकडे असलेल्या मासिक हप्त्यांच्या पावत्या, बुकिंग पावत्या, करारपत्रे, बँक व्यवहारांचे तपशील, रोख रक्कम भरल्याचे पुरावे तसेच इतर सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवून त्यांचे एकत्रित संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधित एजंटांशी संपर्क साधून व्यवहाराची संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करण्याचेही आवाहन बैठकीत करण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रियेत प्रत्येक पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याचे विधीतज्ज्ञांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान संबंधित जागेच्या खरेदी-विक्री प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली. भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक अथवा कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व प्लॉटधारकांनी वैयक्तिक पातळीवर न लढता संघटितपणे कायदेशीर लढा उभारण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. सामूहिक निवेदन, पोलीस तक्रार, महसूल विभागाकडे पाठपुरावा आणि आवश्यकतेनुसार न्यायालयीन कारवाई या बाबींवरही सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेखर उर्फ भोला पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत शेकडो कुटुंबांच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीच्या आधारे पुढील भूमिका घ्यावी, तसेच सर्व ग्राहकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून कायदेशीर लढा अधिक भक्कम करावा, असे त्यांनी सांगितले. उपस्थित ग्राहकांनीही एकसंघ राहून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.





























