![]()
पाचोरा शहरात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले, तर काही ठिकाणी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला होता. या गंभीर अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच शहरातील सर्व मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी ठाम मागणी भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक सुरज संजय वाघ यांनी पाचोरा नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शहरातील नालेसफाई, भुयारी गटारींची स्वच्छता, उघड्या गटारींमधील गाळ काढणे, पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मार्गांची दुरुस्ती तसेच साचलेल्या कचऱ्याचे तातडीने निर्मूलन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. विशेषतः दाट लोकवस्ती असलेले परिसर, कॉलनी भाग, व्यापारी संकुले आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरात पाणी साचणार नाही यासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षी शहरातील अनेक भागांमध्ये नाले आणि गटारी वेळेत साफ न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मुसळधार पावसादरम्यान मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. काही भागांतील भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. नागरिकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला होता. अनेक वसाहतींचा बाजारपेठेशी संपर्क तुटल्याने व्यापारी व्यवहारांनाही मोठा फटका बसला होता. झोपडपट्टी भाग आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाचे कागदपत्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सुरज वाघ यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत यंदा कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. विशेष म्हणजे शहरात काही ठिकाणी मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झालेली असली तरी त्या कामांचा वेग अत्यंत संथ असल्याची नाराजी भाजप नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ज्या दर्जाने आणि ज्या गतीने कामे पूर्ण व्हायला हवीत, त्या तुलनेत प्रत्यक्षात कामकाज अपुरे आणि मंदावलेल्या स्वरूपात सुरू असल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत प्रशासनाने कामकाजात गती आणली नाही तर भाजपाच्या वतीने अधिक आक्रमक भूमिका घेतली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये साचणारा कचरा, बंद पडलेल्या पाण्याच्या नाल्या, तुंबलेल्या गटारी आणि रस्त्यांलगत वाढलेले अतिक्रमण यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना हे निवेदन भाजप गटनेते सुरज वाघ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी भाजपाचे नगरसेवक गोपालदास अर्जुनदास वासवानी, राहुल अंकुश गायकवाड, अमरीन बी. अब्दुल रहेमान देशमुख, कविता विनोद पाटील आणि कविता उमेश हटकर उपस्थित होते. शहरातील नागरिकांना यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकीकडे मान्सून जवळ येत असताना दुसरीकडे शहरातील अनेक समस्या अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत नगर परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कामांना कितपत गती देते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































