लेडीज सिंघम कल्याणी वर्मा यांचा दिव्य मराठीतर्फे गौरव; अवैध धंद्यां विरोधातील धडक कारवायांमुळे परिसरात निर्माण झाला कायद्याचा धाक

Loading

पाचोरा  – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) कल्याणी वर्मा यांना “उत्कृष्ट महिला प्रभारी अधिकारी – जळगाव जिल्हा” हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करून दिव्य मराठीतर्फे गौरविण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कल्याणी वर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणा केवळ गुन्ह्यांची नोंद घेणारी नसून समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारी शक्ती ठरू शकते, याचा प्रत्यय त्यांच्या कामकाजातून नागरिकांना आला. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणाऱ्या विविध बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण मोहिमा राबवल्या. गावठी दारू निर्मिती, अवैध मद्यविक्री, गांजा तस्करी तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवायांमुळे अनेक गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काही अवैध व्यवहारांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परिणामी, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधातही त्यांनी प्रभावी मोहीम उघडली. शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये सुरू असलेल्या विक्री साखळीवर कारवाई करून अनेकांना धडा शिकविण्यात आला. त्याचबरोबर व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम, संवाद उपक्रम आणि विविध सामाजिक मोहिमांद्वारे युवकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला. वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठीही कल्याणी वर्मा यांनी विशेष पुढाकार घेतला. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला. यामुळे रस्ते सुरक्षा, हेल्मेट वापर, सीटबेल्ट बंधनकारकता आणि शिस्तबद्ध वाहनचालना याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. वरखेडी येथे दर गुरुवारी भरविण्यात येणाऱ्या गुरांच्या आठवडे बाजाराकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले. जनावरांच्या खरेदी-विक्रीदरम्यान होणारे गैरव्यवहार, अवैध दलाली, फसवणूक आणि नियमबाह्य व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय करण्यात आली. या उपाययोजनांमुळे बाजारातील वातावरण अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध झाल्याचे व्यापारी व शेतकरी सांगतात. एपीआय कल्याणी वर्मा यांच्या कामाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम महिलांच्या सुरक्षिततेवर झाल्याचे दिसून येत आहे. अनेक माता-भगिनींनी पोलीस प्रशासनाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले आहे. परिसरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण आल्याने अनेक कुटुंबांचे सामाजिक वातावरण सुधारले असून घरगुती कलह आणि व्यसनाधीनतेशी संबंधित समस्या कमी झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, आंबेवडगाव आणि आसपासच्या गावांतील अनेक नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त करत अनेकांनी स्वतंत्रपणे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रशंसापत्रे आणि निवेदने दिल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. महिला संघटना, बचत गट कार्यकर्त्या, सरपंच आणि विविध सामाजिक घटकांसोबत सातत्याने संपर्क ठेवत जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच कार्याची दखल घेत विविध भागांतील महिला संघटना, सरपंच आणि बचत गट कार्यकर्त्यांनी वेळोवेळी त्यांचा सत्कार करून गौरव केला आहे. आज पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीत कल्याणी वर्मा यांची ओळख केवळ पोलीस अधिकारी म्हणून मर्यादित राहिलेली नाही. धाडसी निर्णयक्षमता, कठोर अंमलबजावणी, जनतेशी सुसंवाद आणि गुन्हेगारीविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे त्या “लेडीज सिंघम” म्हणून ओळखल्या जातात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा धाक निर्माण झाला असून “गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून कल्याणी वर्मा नाम ही काफी है” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होताना दिसते. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस प्रशासनाविषयी लोकांचा विश्वास अधिक बळकट करणे या सर्व क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानामुळे एपीआय कल्याणी वर्मा यांना प्राप्त झालेला “उत्कृष्ट महिला प्रभारी अधिकारी – जळगाव जिल्हा” हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा योग्य गौरव मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here