महिला काँग्रेसकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांचा उत्स्फूर्त सत्कार; संघटन बळकटीसाठी एकजुटीचा निर्धार

Loading

पाचोरा : पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ याच्या बळावर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या अॅड. अविनाश भालेराव यांचा पाचोरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुसुमताई पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या अॅड. अविनाश भालेराव यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष इस्माईल भैया होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला अध्यक्ष अरुणाताई पाटील, सरचिटणीस प्रताप पाटील, माजी सचिव अॅड. अंकुश कटारे, माजी नगरसेवक रहीम बागवान, आनंद बागुल आणि युवक काँग्रेस अध्यक्ष शकील इब्राहिम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध आघाड्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यावेळी बोलताना उपस्थित वक्त्यांनी अॅड. अविनाश भालेराव यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा गौरव केला. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास संघर्ष, समर्पण आणि सातत्यपूर्ण संघटनात्मक कामामुळे आज जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अॅड. अविनाश भालेराव यांनी सत्काराला उत्तर देताना पाचोरा तालुका महिला काँग्रेस आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले. जिल्हाध्यक्षपद ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसून कार्यकर्त्यांच्या विश्वासाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेसची संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि पक्षाच्या विविध आघाड्यांना बळकटी देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यक्रमात स्नेहा पटेल, अनिता संजय सोनवणे, लता भागवत सोनार, सखुबाई ताराचंद पाटील, मीराबाई पाटील, रेखा ज्ञानेश्वर पाटील, कल्पना निंबाळकर, शीतल पाटील, शरद पाटील, ज्योती विकास पाटील, माई राजू पाटील, लिलाबाई लाला पाटील, संगीता राजू पाटील, अनिता संतोष सोनवणे, निशा सुनील पाटील, आशा प्रताप पाटील, विश्वेष सपकाळे आणि अविनाश पवार यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत पक्ष संघटनेला अधिक गतिमान करण्यासाठी सक्रिय सहभागाची तयारी दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कपिल पाटील, अमोल गायकवाड, राहुल पाटील, विश्वेश सपकाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अंकुश कटारे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक अरुणाताई पाटील यांनी करताना महिला काँग्रेसच्या कार्याचा आढावा मांडला आणि नव्या नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तर आभार प्रदर्शन कल्पना निंबाळकर यांनी केले. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील विविध घटक, महिला कार्यकर्त्या, युवक आणि ज्येष्ठ पदाधिकारी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अॅड. अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. पाचोरा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here