‘योगातून निरोगी समाजाचा संकल्प’: पाचोरा-भडगाव परिसरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह, ऊर्जा आणि जनजागृतीच्या वातावरणात संपन्न…!

0

Loading

पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधत आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग दाखविणाऱ्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचोरा व भडगाव परिसरातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योगसाधना करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ‘योग ही केवळ व्यायामपद्धती नसून जीवन जगण्याची संस्कृती आहे’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात योग दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, योगाचार्य नारायण मांडवडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. योगाचार्य नारायण मांडवडे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर सुदृढ राहण्याबरोबरच मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले. आयुर्वेद, संतुलित आहार आणि दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयींचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या योगसत्रात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. यावेळी सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयक स्नेहल पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या क्रीडा विभागाने केलेल्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. दरम्यान, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथेही जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक क्षीरसागर सर, गायत्री पाटील मॅडम आणि रीना पाटील मॅडम यांनी योगाचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित करत विद्यार्थ्यांना विविध शारीरिक कवायती, ध्यानधारणा आणि मनःशांती साधण्यासाठी उपयुक्त योगपद्धतींचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना योगाभ्यासाची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षिका ए. आर. गोहील मॅम, आर. बी. बांठिया सर, एम. टी. कौंडिण्य सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. बोरसे सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य सक्षम राहते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लिनस क्लब ऑफ पाचोरा तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘हेल्दी एजिंग’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा आणि योगाचार्य प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांनी वाढते वय आणि बदलती जीवनशैली यांचा आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट करत नियमित योगसाधना ही निरोगी वृद्धत्वासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. भारत युवा राष्ट्र असले तरी आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार असून मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, नौकासन, धनुषासन, पावनमुक्तासन, सूर्यनमस्कार, भस्त्रिका, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा यांचा सराव करण्यात आला. योगाभ्यासानंतर उपस्थितांनी शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि अंतर्मनातील प्रसन्नतेची अनुभूती व्यक्त केली. कार्यक्रमास PRO चेतना हिरे, मोनिका थेपडे, अंकिता अग्रवाल, रूपाली पाटील, सरला पाटील, मंजुषा अग्रवाल, मोनिका अग्रवाल तसेच पिंकी जिनोदिया उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी नियमित योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. भडगाव येथील सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक व सौ. जयश्रीताई गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयातही योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्राचार्य ए. बी. अहिरे सर, उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे मॅडम, पर्यवेक्षक शरद महाजन सर व तायडे सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामूहिक योगाभ्यास केला. योग मार्गदर्शक सोनजे सर यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगत नियमित सरावामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, तणाव कमी होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन केले. या सर्व कार्यक्रमांमधून एक समान संदेश अधोरेखित झाला तो म्हणजे आधुनिक धावपळीच्या युगात योग ही केवळ परंपरा नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प केला. आरोग्य, आत्मशिस्त, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारसरणी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला सामाजिक जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले. योगाच्या माध्यमातून निरोगी व्यक्ती, सुदृढ कुटुंब आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीचा संदेश परिसरभर प्रभावीपणे पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here