Home Dhyeya News Special भडगावातील बॅग हिसकावून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज...

भडगावातील बॅग हिसकावून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, पाच आरोपी जेरबंद

0
189

Loading

भडगाव – शहरात भरदिवसा घडलेल्या बॅग हिसकावून रोख रक्कम लुटीच्या धाडसी गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे भडगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीचा मोठा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे तपासातून समोर आले असून, फायनान्स कंपनीतील जमा होणाऱ्या रकमेची अचूक माहिती मिळवून संपूर्ण कट रचण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी यश हिरामण हटकर, रा. शिवनेरी गेट, भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडील सुमारे ₹51 हजार 560 रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासादरम्यान या गुन्ह्यात भा.न्या.सं. कलम 310(1) ची वाढ करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती, स्थानिक माहितीदारांचे जाळे तसेच संशयितांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली ती म्हणजे आरोपी उदय छोटू गायकवाड हा यापूर्वी भडगाव येथील भारत फायनान्स कंपनीत काम करत होता. त्यामुळे कंपनीत दररोज जमा होणारी रक्कम कोण घेऊन जातो, किती वाजता जातो आणि त्याची पद्धत काय आहे, याची त्याला संपूर्ण माहिती होती. याच माहितीचा गैरफायदा घेत त्याने साथीदारांसह लुटीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी उदय छोटू गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड करत संपूर्ण कटाची माहिती दिली. त्यानुसार आरोपी अनिल दिलीप पाटील (रा. पळासखेडा, ता. भडगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (रा. पूर्वीपाडा, ता. जि. धुळे), निलेश अण्णा पवार (रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), योगेश प्रकाश पवार (रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा, ता. भडगाव) व हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला, जि. नाशिक) यांनी मिळून हा संपूर्ण कट रचला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दि. 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी वेगवेगळ्या मोटारसायकलींवरून भडगाव येथे एकत्र आले. त्यानंतर नियोजनानुसार काही आरोपींनी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवली, तर काही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून मोबाईलद्वारे संपर्क साधत परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. योग्य संधी साधून बॅग हिसकावण्यात आली आणि त्यानंतर सर्व आरोपी वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. घटना घडल्यानंतर संशय येऊ नये म्हणून प्रत्येक आरोपी आपल्या घरी परतल्याचेही तपासात उघड झाले. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. पथकाने अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीचा प्रभावी वापर करून आरोपींचा माग काढला. अखेर सलग पाठपुरावा, चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळाले. या कारवाईत उदय छोटू गायकवाड (वय 22 वर्षे, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), अनिल दिलीप पाटील (वय 31 वर्षे, रा. पळासखेडा, ता. भडगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (वय 26 वर्षे, रा. पूर्वीपाडा, ता. जि. धुळे), निलेश अण्णा पवार (वय 20 वर्षे, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) आणि योगेश प्रकाश पवार (वय 22 वर्षे, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून सुमारे 25 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेल्या इतर साधनसामग्रीचा तसेच उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यातील सागर हिम्मत पाटील आणि हर्षल चांगदेव अहिरे हे अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना. राहुल पाटील, पोकॉ. ईश्वर पाटील, पोकॉ. जितेंद्र पाटील, पोकॉ. भुषण पाटील आणि चापोकॉ. रिजवान शेख यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या बळावर अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत. फरार आरोपींना अटक झाल्यानंतर या गुन्ह्यात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!