Home Dhyeya News Special पाचोरा-चाळीसगाव दरम्यान मध्यवर्ती असलेल्या कजगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या पार्सल वाहतुकीला हिरवा...

पाचोरा-चाळीसगाव दरम्यान मध्यवर्ती असलेल्या कजगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या पार्सल वाहतुकीला हिरवा कंदील; व्यापारी, शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी नवी संधी

0
54

Loading

भुसावळ : मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने पाचोरा-चाळीसगाव दरम्यान मध्यवर्ती असलेल्या कजगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या पार्सल वाहतुकीस अधिकृत मान्यता दिल्याने परिसरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे आता कजगावसह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना रेल्वेमार्फत मालाची आवक-जावक अधिक जलद, सुरक्षित आणि कमी खर्चात करता येणार असून, स्थानिक व्यापार आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. कजगाव रेल्वे स्थानक हे पाचोरा-चाळीसगाव दरम्यान मध्यभागी असलेले महत्त्वाचे स्थानक असल्याने या परिसरातील व्यापारी वर्गाला याचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी पार्सल बुकिंग किंवा माल स्वीकारण्यासाठी इतर स्थानकांवर जावे लागत असल्याने अतिरिक्त वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार कजगाव स्थानकावर आवक व जावक स्वरूपातील सर्व प्रकारच्या पार्सलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये इंडेंटेड व्ही.पी., JPP-RCS (जॉइंट पार्सल प्रॉडक्ट – रेल्वे कार्गो सेवा) तसेच पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनद्वारे होणाऱ्या पार्सल वाहतुकीचाही समावेश आहे. त्यामुळे विविध प्रकारचा माल देशातील अनेक शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पाठविणे तसेच प्राप्त करणे अधिक सोपे होणार आहे. कृषीप्रधान भाग म्हणून ओळख असलेल्या या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. भाजीपाला, फळे, धान्य तसेच इतर कृषी उत्पादने कमी वेळेत बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादनांचा दर्जा टिकून राहण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांना अधिक चांगल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय लघुउद्योजक, किरकोळ व्यापारी, औद्योगिक साहित्य पुरवठादार तसेच ई-कॉमर्सशी संबंधित व्यवसायांनाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. वेळेत मालाची देवाणघेवाण झाल्यामुळे व्यावसायिक व्यवहार अधिक गतिमान होतील आणि ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा कालावधीही कमी होईल. मध्य रेल्वे, भुसावळ विभाग मालवाहतूक आणि पार्सल सेवांचा सातत्याने विस्तार करत असून, ग्राहकाभिमुख सुविधा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. रेल्वेमार्गे अधिकाधिक मालवाहतूक वाढविणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागाला आधुनिक वाहतूक व्यवस्थेशी जोडणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रशासनाने व्यापारी, व्यावसायिक, उद्योग समूह, शेतकरी तसेच सर्व ग्राहकांनी पाचोरा-चाळीसगाव दरम्यान मध्यवर्ती असलेल्या कजगाव रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या या आधुनिक पार्सल सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे कजगाव रेल्वे स्थानकाची ओळख केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता, उत्तर महाराष्ट्रातील व्यापार आणि कृषी विकासाला चालना देणारे महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र म्हणून अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!