![]()
पाचोरा : स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सोसलेल्या यातना, केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान पुढील पिढ्यांच्या स्मरणातून कधीही पुसले जाऊ नये, यासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पाचोरा तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा इतिहास दस्तऐवजीकरण करण्याबरोबरच पाचोऱ्यातील हुतात्मा स्मारकाचा व्यापक पद्धतीने कायापालट करून स्वातंत्र्यलढ्याची गाथा माहितीपट, भित्तीपट आणि विशेष पुस्तिकेच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वानिमित्त पाचोरा भडगाव शिवसेना-युवा सेना यांच्या वतीने पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यसैनिक कृतज्ञता सोहळ्यात आ. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वपूर्ण संकल्प जाहीर करण्यात आला. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. आ. किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यसैनिकांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागालाही योग्य न्याय मिळायला हवा, अशी भूमिका मांडली. आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी समर्पित करणाऱ्या कुटुंबीयांचे योगदानही तितकेच मोठे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग हा केवळ इतिहासातील एक अध्याय न राहता आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत बनला पाहिजे. सक्षम, समृद्ध, स्वाभिमानी आणि विकसित राष्ट्र उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले. याच वेळी त्यांनी पाचोऱ्यातील हुतात्मा स्मारकाला अधिक व्यापक आणि ऐतिहासिक स्वरूप देण्याची घोषणा केली. पाचोरा तालुक्यात स्वातंत्र्यसंग्रामात हुतात्मा झालेले वीर, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना जखमी झालेले स्वातंत्र्यसैनिक, कारावास भोगलेले कार्यकर्ते तसेच विविध आंदोलनांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती एकत्रित करून ती माहितीपट आणि भित्तीपटाच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यापुढील महत्त्वाचे पाऊल म्हणून पाचोरा शहर, तालुका आणि परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्यचळवळीतील योगदानावर विशेष पुस्तक प्रकाशित करण्याची घोषणाही आ. किशोर पाटील यांनी केली. या पुस्तकाच्या माध्यमातून पाचोऱ्याच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन भविष्यातील संशोधक, विद्यार्थी आणि नव्या पिढीसाठी ती ऐतिहासिक संदर्भसामग्री ठरेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमाला आधार देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांकडे असलेल्या जुन्या कागदपत्रांचे आणि आठवणींचे संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताम्रपत्र, सन्मानपत्र, स्वातंत्र्यसैनिक पेन्शन ऑर्डर, तुरुंगवासाचे प्रमाणपत्र, सरकारी पत्रव्यवहार, आंदोलनातील सहभागाच्या नोंदी, जुनी छायाचित्रे, पत्रे, डायरी किंवा कुटुंबीयांकडे जतन असलेली मौखिक माहिती अशा प्रत्येक पुराव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कृतज्ञता सोहळ्यात आ. किशोर पाटील यांच्या हस्ते सुपडू भादू पाटील, हुतात्मा महादू चिंधा माळी, हुतात्मा छगन राजाराम लोहार, नथ्थू महादू पाटील, लाभचंद जगजीवन रामशेठ, दामोदर लोटन महाजन, बाजीराव धुरसिंग पाटील, श्रीपत दलचंद तेली, बळीराम शिवराम शिंपी, बळीराम वेडू पाटील, रामचंद्र खंडू जोशी, महादेव लाला पाटील, लोटन सोनजी पाटील, कपूरचंद मुथा, उखडू मल्हारी पाटील, जनार्दन बळवंत वाणी, सांडू गुलाबसिंग राजपूत, राजाराम धनजी पाटील, चंपकलाल रविशंकर मोदी, महादू मोतीराम परदेशी, पै. रोज महंमद शालम पठाण, केशव पांडू शिंदे, नागोशेठ बारकू सोनार, अमृत देवराम पाटील, जयवंतराव चिमणराव गरुड यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, तहसीलदार विजय बनसोडे, पो.नि. राहुल पवार उपस्थित होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, पाचोरा पालिकेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, भोला पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, समन्वयक गजू पाटील, माजी नगरसेवक रवी पाटील, राजेश पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी पाचोरा तालुक्याच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची आणि स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व स्पष्ट करताना रस्ता सुरक्षितता आणि स्वयंशिस्तीचा संदेश दिला. तहसीलदार विजय बनसोडे यांनी देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान आवश्यक असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या वतीने संदीप महाजन यांनी आ. किशोर पाटील आणि शिवसेनेचे आभार मानले. त्यांनी चले जाव आंदोलनाच्या काळात सुपडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथे झालेल्या आंदोलनाच्या आठवणी सांगत त्या काळातील संघर्षाचे ज्वलंत चित्र उपस्थितांसमोर उभे केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कागदपत्रांच्या व छायाचित्रांच्या छायांकित प्रती नाना वाघ – Mo. 9422212473 किंवा गजुभाऊ – Mo. 99212 11677 यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यचळवळीतील कार्य, आठवणी, प्रसंग आणि उपलब्ध मौखिक किंवा लेखी इतिहास ‘झुंज’ वृत्तपत्र & ‘ध्येय न्यूज’चे संपादक तसेच स्वातंत्र्यसैनिक पुत्र व नामनिर्देशित पाल्य संदीप महाजन – Mo. 7385108510 यांच्याकडे WhatsApp द्वारे पाठविता येणार आहे. प्राप्त माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पाचोरा शहर, तालुका व परिसराच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा व्यापक ऐतिहासिक दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे घरातील जुन्या पेटीत किंवा कपाटात जपून ठेवलेला एखादा कागद, फोटो अथवा आठवणही या ऐतिहासिक कार्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले. स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचोऱ्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाची पाने केवळ इतिहासाच्या पुस्तकात न राहता ती पुढील पिढीच्या मनात जिवंत राहावीत, यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी घेतलेला हा पुढाकार स्थानिक इतिहासाच्या जतनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






























