Home Dhyeya News Special विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष; एसटी बससेवेतील त्रुटींवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आवाज...

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष; एसटी बससेवेतील त्रुटींवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आवाज बुलंद

0
64

Loading

पाचोरा : विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी पाचोरा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानादरम्यान ठेवण्यात आलेल्या तक्रार वहीत अनेक गंभीर प्रश्नांची नोंद झाली आणि त्यातून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विद्यार्थी प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पाचोरा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एसटी बससेवेशी संबंधित अडचणी मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हा प्रश्न थेट एसटी प्रशासनाच्या दरबारात नेला आहे. पाचोरा परिसरात विद्यार्थी संघटनांची सक्रियता गेल्या काही वर्षांत कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी, शैक्षणिक सुविधा आणि वाहतुकीशी निगडित प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यामुळे तक्रार वहीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळताच अनेकांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे नोंदवल्या. त्यामध्ये एसटी बस निर्धारित थांब्यावर न थांबणे, बसफेऱ्यांच्या वेळेत सुसूत्रता नसणे, महाविद्यालयीन वेळेशी वाहतुकीचे वेळापत्रक न जुळणे, परिणामी विद्यार्थ्यांचे लेक्चर बुडणे अशा समस्या प्रकर्षाने पुढे आल्या. काही विद्यार्थ्यांनी अशीही व्यथा मांडली की, अधिकृत थांबा निश्चित असतानाही काही बसचालक त्या ठिकाणी बस न थांबविता पुढे निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते किंवा पर्यायी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही बाब केवळ प्रवासाची गैरसोय नसून त्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम करणारी ठरत आहे. सकाळच्या वेळेत बस उशिराने मिळाल्यास महाविद्यालयातील महत्त्वाचे तास चुकतात आणि नियमित उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. शहराध्यक्ष ऋषिकेश भोई तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोरा तालुका बस आगार प्रमुखांकडे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. अधिकृत विद्यार्थी थांब्यांवर बस थांबविण्याबाबत चालक व वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात आणि शाळा-महाविद्यालयांच्या वेळांचा विचार करून बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाचोऱ्यात विद्यार्थी प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर आवाज उठविण्याची परंपरा पूर्वीपासून राहिली आहे. महाविद्यालये व शाळांमध्ये आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांपासून ते त्याची पावती न देण्यापर्यंतच्या प्रश्नांवर भारतीय विद्यार्थी सेनेने यापूर्वी आंदोलने केली होती. १९८९ मध्ये एसटी महामंडळाच्या बस डेपोतील विविध समस्यांविरोधात मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामुळे आज पुन्हा विद्यार्थी प्रश्नांना संघटितपणे व्यासपीठ मिळणे ही बाब लक्षवेधी ठरत आहे. एसटी वाहतुकीबरोबरच विद्यार्थ्यांच्या स्कूल बस व इतर वाहतूक व्यवस्था, खासगी शाळांकडून आकारली जाणारी वाढती फी, आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती, कमी वेतनावर शिक्षकांकडून सेवा घेणे आणि त्याच शिक्षकांना शाळेबाहेर खासगी शिकवण्या घेण्यास दिली जाणारी मुभा, अशा अनेक प्रश्नांवरही विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. हे प्रश्न केवळ एखाद्या विद्यार्थ्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असल्याने त्यावर व्यापक चर्चा आणि ठोस पाठपुरावा होणे आवश्यक आहे. “विद्यार्थ्यांच्या तक्रारी केवळ वहीत लिहून ठेवण्यासाठी नाहीत; त्या प्रश्नांचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करण्याची आमची भूमिका आहे,” अशी स्पष्ट भूमिका श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या मूलभूत प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुढील काळातही सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!