Home Dhyeya News Special पाचोरा पोस्ट ऑफिसच्या कारभाराबाबत डाक अदालतीत तक्रार दाखल; खिडक्यांवरील अपुरी माहिती, अप-डाऊन...

पाचोरा पोस्ट ऑफिसच्या कारभाराबाबत डाक अदालतीत तक्रार दाखल; खिडक्यांवरील अपुरी माहिती, अप-डाऊन व तिकिटांच्या उपलब्धतेचा मुद्दा ऐरणीवर

0
91

Loading

पाचोरा : पोस्ट ऑफिसमध्ये कामासाठी गेलेल्या नागरिकाला नेमके कोणत्या खिडकीवर जायचे, हेच समजत नसेल आणि नंबर आल्यानंतर ‘तुमचे काम दुसऱ्या खिडकीवर आहे’, असे सांगितले जात असेल, तर ग्राहकसेवेच्या या पद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पाचोरा शहरातील पोस्ट ऑफिसच्या कामकाजाबाबत अशाच विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधत Dhyeya News & सा. झुंजचे संपादक संदीप दा. महाजन यांनी डाक अदालतीत तक्रार दाखल केली असून, ग्राहकांना अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेची बचत करणारी सेवा मिळावी, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे. पाचोरा पोस्ट ऑफिसमध्ये शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यातील मोठा वर्ग ग्रामीण आणि अल्पशिक्षित असल्याने खिडक्यांवर काचेवर लावलेले इंग्रजी शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त उल्लेख अनेकांना सहज समजत नाहीत. त्यामुळे कोणत्या खिडकीवर कोणते काम केले जाते, याची माहिती नसल्याने नागरिक एखाद्या रांगेत उभे राहतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर क्रमांक आल्यावर दुसऱ्या खिडकीकडे जाण्याची सूचना मिळाल्यास त्यांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक खिडकीवर मोठ्या व स्पष्ट अक्षरांत मराठी भाषेत त्या ठिकाणी केली जाणारी सर्व कामे नमूद करणारे माहितीफलक लावणे आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नागरिकाला कार्यालयात प्रवेश करताच कोणते काम कुठे होते, हे स्पष्टपणे समजले पाहिजे. केवळ काचेवर लहान अक्षरांत किंवा इंग्रजीतील शॉर्ट फॉर्ममध्ये माहिती देणे ग्रामीण ग्राहकांसाठी पुरेसे ठरत नाही. तसेच कार्यालयात कार्यरत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टेबलावर नाव, पद आणि त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज स्पष्ट करणारा नामफलक असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकाला आपल्या कामासाठी नेमक्या कोणत्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याशी संपर्क साधायचा, हे सहज समजू शकेल. तक्रारीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनच्या मुद्द्याकडेही गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले आहे. पाचोरा पोस्ट ऑफिसमध्ये बाहेरून ये-जा करणारे अधिकारी व कर्मचारी किती आहेत, त्यांचे पाचोरा शहरातील प्रत्यक्ष निवासस्थान कोठे आहे, ते कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित असतात का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांची हजेरी नोंद, बायोमेट्रिक नोंद आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांची तपासणी केल्यास कार्यालयीन कामकाजावर त्यांच्या येण्या-जाण्याचा परिणाम होतो का, हे स्पष्ट होऊ शकते. हा मुद्दा कोणत्याही व्यक्तीविरोधातील आरोप म्हणून नव्हे, तर सार्वजनिक सेवेत कार्यालयीन शिस्त व उपस्थितीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने मांडण्यात आला आहे. याशिवाय वृत्तपत्रांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या २५ पैशांच्या टपाल तिकिटांची उपलब्धता हा देखील महत्त्वाचा प्रश्न तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील नियमित टपाल व्यवहारासाठी अशा तिकिटांची आवश्यकता असताना ती उपलब्ध नसल्याने संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे या तिकिटांचा पुरेसा साठा व नियमित उपलब्धता याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यालयाची सकाळची सुरुवातीची वेळ, सायंकाळची सेवा समाप्तीची वेळ तसेच भोजनावकाश याबाबत दर्शनी भागात स्पष्ट माहितीफलक असावा. भोजनाच्या वेळेत ग्राहकसेवा पूर्णपणे ठप्प होणार नाही, यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी स्वतंत्र व सुसूत्र ग्राहक मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संदीप दा. महाजन यांनी स्पष्ट केले की, ही तक्रार कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्याच्या हेतूने करण्यात आलेली नसून, पाचोरा पोस्ट ऑफिसची ग्राहकसेवा अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. डाक अदालतीने पाचोरा पोस्ट ऑफिसची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, आवश्यक सुधारणा सुचवाव्यात आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल तक्रारदाराला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकाने रांगेत उभे राहण्यापूर्वीच त्याचे काम कुठे होणार आहे, कोणाकडे करायचे आहे आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, हे स्पष्टपणे समजणे हीच प्रभावी ग्राहकसेवेची खरी कसोटी आहे. त्यामुळे आता डाक अदालतीकडून या तक्रारीची कितपत दखल घेतली जाते आणि पाचोरा पोस्ट ऑफिसच्या व्यवस्थेत प्रत्यक्ष कोणते बदल होतात, याकडे नागरिकांसह वृत्तपत्र क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!