![]()
पाचोरा : पाचोरा शहरातील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल अर्थात ROB (Road Over Bridge) प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, पाचोरा शहरातील विविध सर्व्हे व गट क्रमांकांतील एकूण ३२१ जमीनधारकांना भूसंपादन मोजणीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या पाचोरा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी ही भूसंपादन मोजणी नोटीस जारी केली आहे. नोटिशीनुसार भूसंपादन मोजणी अर्ज क्रमांक CAN-(नाशिक) नियमित-238526 असून, मोजणी प्रकरण क्रमांक 111039 असा आहे. या प्रकरणातील संयुक्त मोजणी १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे. संबंधित जमीनधारक अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी निश्चित वेळेत प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भूसंपादन प्रक्रियेत पाचोरा शहरातील अनेक सर्व्हे व गट क्रमांकांचा समावेश आहे. नोटिशीत १८, १९, ११, १२, २९७, ३०१, ३०५, ३२८, ३२७, ३२०, १५, १६, १७, ५३, ५६ यासह इतर क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्तावित ROB प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा परिसर मोठ्या प्रमाणावर असल्याचे नोटिशीतून स्पष्ट होते. या प्रकरणात SDM पाचोरा यांना भूसंपादन अधिकारी, DYCE Construction, Central Railway, Bhusawal यांना भूसंपादन मंडळ, तर जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कार्यालय भूसंपादन आदेश देणारे कार्यालय म्हणून नमूद करण्यात आले आहे. संयुक्त मोजणीच्या दिवशी संबंधितांनी भूकरमापकासोबत जागेवर जाऊन प्रत्यक्ष सीमांकन दाखवावे, तसेच मोजणीचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोजणीसाठी आवश्यक चार निशाणदार मजूर, उंच काठ्या, छत्री आणि चुना आदी साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधितांवर सोपविण्यात आली आहे. नोटिशीत संबंधित जमीनधारक गैरहजर राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोजणी करणारे कर्मचारी म्हणून ओमप्रकाश कोळी यांचे नाव नमूद असून, त्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. नोटिशीमध्ये पाचोरा नगरपरिषद, नगरपालिका, राज्य परिवहन विभाग तसेच विविध खासगी जमीनधारकांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. त्यामुळे ROB प्रकल्पासाठी होणारी ही मोजणी पाचोरा शहरातील विविध भागांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ‘झुंज’ वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांच्या हाती आलेल्या या अधिकृत भूसंपादन मोजणी नोटिशीमुळे पाचोरा ROB प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ पानी या नोटिशीत एकूण ३२१ जमीनधारकांचा समावेश असून, १ सप्टेंबर रोजी होणारी संयुक्त मोजणी ही पाचोरा ROB प्रकल्पाच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाची पायरी ठरणार आहे.





























