![]()
पाचोरा : दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. मात्र आहार, दिनचर्या, निसर्गाशी सुसंगत जीवनपद्धती आणि मनःशांतीच्या साधनेतून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करता येते, असा महत्त्वपूर्ण संदेश पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमातून देण्यात आला. शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उप मुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. बाठिया, पर्यवेक्षक एम.टी. कौडिण्य, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक एस.पी. करंदे तसेच श्रीमती. एस.एस. पाटील यांची उपस्थिती होती. हेल्थ केअर सेंटर कुर्ला (मुंबई) चे संस्थापक डॉ.श्री. गिरीश जैन यांनी उपस्थितांना निसर्गोपचाराच्या विविध पैलूंची माहिती देताना आरोग्य टिकविण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले. मधुमेह, उच्च व कमी रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात, ऍसिडिटी, डोकेदुखी, एलर्जी तसेच कर्करोगासारख्या आजारांबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. शरीराला मिळणारा आहार, नियमित हालचाल, योग्य विश्रांती आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब यांचा आरोग्यावर होणारा परिणाम त्यांनी सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केला. केवळ आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक जीवनशैली स्वीकारणे अधिक उपयुक्त ठरते, याकडेही डॉ. जैन यांनी विशेष लक्ष वेधले. आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यालाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगत कार्यक्रमात विपश्यना साधनेविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. श्री. सु.भा.पाटील विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सारिका पाटील यांनी विपश्यनेचे स्वरूप स्पष्ट करताना ही दुःखमुक्तीकडे नेणारी आणि मनाला निर्मळ करणारी साधना असल्याचे सांगितले. मनातील अस्थिरता, ताणतणाव आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आत्मनिरीक्षण व सजगतेची साधना महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही मानसिक एकाग्रता, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जडणघडण होणे आवश्यक असून, अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे आरोग्याविषयीची जाणीव अधिक व्यापक होते, असा सूर उपस्थितांमधून व्यक्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. बी.बोरसे सर यांनी प्रभावीपणे केले, तर श्री.उज्वल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थितांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





























