![]()
पाचोरा – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांचीही समर्थपणे सांगड घालणाऱ्या डॉ. सौ. धनश्री सिद्धार्थ चौधरी यांनी मेडिकल बायोकेमिस्ट्री शाखेत विद्यावाचस्पती अर्थात Ph.D. पदवी संपादन करून आपल्या कुटुंबासह समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रातही मानाचा ठसा उमटविला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजमधून त्यांनी ही उच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे. डॉ. सौ. धनश्री सिद्धार्थ चौधरी या दोडे गुर्जर समाजाचे प्रथम आमदार धनवाडीकर स्व. माधवराव कौतिक चौधरी यांच्या नातसून आहेत. डॉ. उत्तम माधवराव चौधरी M.B.B.S. व सौ. हेमलता चौधरी यांच्या त्या ज्येष्ठ स्नुषा असून, दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ उत्तम चौधरी (M.D.S.) यांच्या अर्धांगिनी आहेत. तसेच समाजात सुपरिचित असलेले स्वर्गीय डॉ. प्रताप द. जाधव यांच्या त्या भाची असून, सौ. संजीवनी व धर्मराज केशरसिंग अर्थात डी.के. पाटील, निरूळ-जळगाव यांच्या सुकन्या आहेत. मेडिकल बायोकेमिस्ट्रीसारख्या वैद्यकीय विज्ञानातील महत्त्वपूर्ण शाखेत Ph.D. संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधनाची आवड, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि दीर्घकाळ संयमाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. या सर्व बाबींची सांगड घालत डॉ. धनश्री यांनी आपल्या संशोधनाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. विशेष म्हणजे, उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या या आव्हानात्मक काळात त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही तितक्याच समर्थपणे पार पाडल्या. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कुटुंबाची पार्श्वभूमी आणि स्वतःची शैक्षणिक जिद्द यामुळे त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या कर्तृत्वातून महिलांसाठी तसेच उच्च शिक्षण आणि संशोधनाची वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या शैक्षणिक यशाला व्यावसायिक क्षेत्रातील नवी संधीही लाभली आहे. Ph.D. पदवी संपादन केल्यानंतर लगेचच डॉ. सौ. धनश्री सिद्धार्थ चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होत अध्यापन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. संशोधनातून संपादन केलेले ज्ञान आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असून, त्यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. डॉ. धनश्री यांच्या या यशामुळे चौधरी व जाधव परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि कर्तृत्वाची दखल घेत विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सौ. धनश्री सिद्धार्थ चौधरी यांनी संपादन केलेले हे यश त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच चौधरी व जाधव परिवारासाठी आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ज्ञान, संशोधन आणि अध्यापन या तिन्ही क्षेत्रांत त्यांची ही यशस्वी वाटचाल अधिक व्यापक आणि प्रेरणादायी ठरो, तसेच त्यांच्या हातून वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान घडो, हीच सदिच्छा. या उज्ज्वल शैक्षणिक व व्यावसायिक यशाबद्दल डॉ. सौ. धनश्री सिद्धार्थ चौधरी यांचे ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन, पाचोरा व परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या ज्ञानसाधनेला यशाची नवी शिखरे लाभोत, कर्तृत्वाचा हा प्रवास अधिक उंचावत जावो आणि भावी पिढ्यांसाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा दीप सदैव प्रज्वलित राहो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!





























