![]()
पाचोरा : भाषेचे वैभव केवळ तिच्या इतिहासात नसते, तर ती पुढच्या पिढीच्या बोलण्यात, लेखनात आणि वाचनात किती जिवंत राहते, यावर तिचे भवितव्य अवलंबून असते. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवत पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, भाषिक जाणीव आणि मराठी साहित्याविषयी आत्मीयता निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. आ. दिलीपभाऊ वाघ आणि शिंदखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय मनोगतात मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांनी “वाचन हे एक प्रभावी शस्त्र आहे” असे सांगत विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन केले. नियमित वाचनामुळे विचारांची व्याप्ती वाढते, स्मरणशक्तीला चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचनाची सवय सातत्याने जोपासली, तर ज्ञानाच्या या शस्त्राला अधिक धार प्राप्त होते, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब विनय जकातदार यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा, असा संदेश दिला. बोलणे, वाचन आणि भाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास विकसित करावा. भाषेच्या समृद्ध परंपरेचे जतन करण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी मराठी भाषेच्या प्रदीर्घ वाटचालीचा आढावा घेत अभिजात मराठी भाषेच्या ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. प्रारंभीच्या मराठी वाङ्मयापासून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंतचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी युवकांनी वाङ्मयीन व्यासपीठे आणि विविध भाषिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव एस. वले यांनी प्रास्ताविकातून सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, तात्यासाहेब शिवदास पाटील, माजी प्राचार्य बापु साहेब डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कवी पांडुरंग सुतार, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, कार्यालय अधीक्षक नितीन पाटील, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. रचना एम. गजभिये, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, डॉ. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, डॉ. सरोज अग्रवाल, डॉ. प्राजक्ता शिरोळे, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. जयश्री वर्मा-वाघ, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मेघा गायकवाड, प्रा. लक्ष्मी गलाणी, बी. जी. पवार, सुरेंद्र तांबे, जावेद देशमुख, जयेश कुमावत, प्रवीण खेडकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले, तर आभार डॉ. माणिक पाटील यांनी मानले.





























