![]()
मुबई – (गुरुदत्त वाकोदेकर) ‘कृष्णदीप दीपावली विशेषांक २०२६’ हा दिवाळी अंक साहित्याची समृद्ध परंपरा जपत वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरतो. वारकरी प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित या अंकात कथा, कविता, वैचारिक व ललित लेख आणि पुस्तक परीक्षणांचा समावेश असून, वाचकांना साहित्याच्या विविध पैलूंचा अनुभव देण्यात आला आहे. कांचन गवळी / मुंढे यांच्या संपादनाखाली, ज्येष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने, कार्यकारी संपादक संदीप राक्षे आणि उपसंपादिका संगीता शिंदे-गव्हाणे यांच्या सहकार्याने अंक साकारला आहे. ‘वासुदेव’, ‘मातृत्व’, ‘आर्त हाक मुलीची!’, ‘गोष्ट चिऊताईची’, ‘बांध!!’, ‘नात्याचे उसवलेले बंध’, ‘पिशाच्य रूप’ आणि ‘बोधेवाडीचा ढाण्या वाघ’ यांसारख्या कथा मानवी संवेदना, नातेसंबंध, सामाजिक प्रश्न आणि ग्रामीण वास्तव अधोरेखित करतात. स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण संवर्धन, माणुसकी, श्रद्धा-विवेक आणि आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांना साहित्यिक अभिव्यक्ती मिळाली आहे. ‘कृत्रिम बुद्धी, खरी फजिती’ आणि ‘टोलनाक्यावर भेटलेली ती…’ या कथांमधून समकालीन विषयांचे वेगळे दर्शन घडते. सहज, ओघवती लेखनशैली, जिवंत व्यक्तिरेखा आणि भावनिक प्रसंग हे अंकाचे वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी मुद्रितशुद्धी आणि कथानकातील प्रसंगांची संयत मांडणी अधिक प्रभावी होण्यास वाव असला, तरी हा अंक मनोरंजनासोबत विचारप्रवृत्त करणारा आहे. साहित्यप्रेमींनी आवर्जून वाचावा असा हा दिवाळी विशेषांक आहे. पुस्तक परिचय : कृष्णदीप दीपावली विशेषांक २०२६ (द्वितीय वर्ष, द्वितीय अंक) | संपादिका : कांचन गवळी / मुंढे | कार्यकारी संपादक : संदीप राक्षे | उपसंपादिका : संगीता शिंदे-गव्हाणे | पृष्ठसंख्या : ११४ | प्रकाशन : वारकरी प्रकाशन, मुंबई | मूल्य : १८० रुपये (स्वागत मूल्य) © गुरुदत्त दिनकर वाकदेकर



































