![]()
जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या तीन महिला खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल व हॉकी संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. मलेशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी होऊन जळगावचे नाव उंचावणाऱ्या हिमाली विलास बोरोले व ममता जगदीश प्रजापती, तसेच १५ वर्षांखालील फुटबॉल संघात जिल्ह्यातून निवड झालेल्या शौर्य चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जळगाव क्रीडा महासंघाचे अध्यक्ष तथा चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंना क्रीडा साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून हिमाली बोरोले व ममता प्रजापती यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील नवोदित महिला हॉकी खेळाडूंना द्यावा, त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्राकडे वळवावे, असे आवाहन केले. शौर्य चौधरी हिच्या निवडीचे कौतुक करून तिच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जळगावच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध करणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाला फारुक शेख, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, प्रशिक्षक तौसिफ खान व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रशिक्षक कार्तिक उपस्थित होते. या खेळाडूंच्या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे.



































