Home Dhyeya News Special पक्षनिष्ठा, अहोरात्र जनसंपर्क अन् नेतृत्वाचा विश्वास; किशोर बारवकर यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा!

पक्षनिष्ठा, अहोरात्र जनसंपर्क अन् नेतृत्वाचा विश्वास; किशोर बारवकर यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा!

0
308

Loading

पाचोरा – राजकीय जीवनात पदापेक्षा पक्षनिष्ठा, नेतृत्वाचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेशी जपलेली नाळ यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांना पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रभारी नगराध्यक्षपद देण्यात आले आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा सुनीता किशोरआप्पा पाटील यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार सोपविला आहे. काही कौटुंबिक कारणांमुळे नगराध्यक्षा सुनीता पाटील यांना आगामी महिनाभर पालिकेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होणार नसल्याने नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाशी असलेली निष्ठा, पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील सहभाग, अहोरात्र जनसंपर्क आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी जोडलेली नाळ ही किशोर बारवकर यांच्या राजकीय वाटचालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या किशोर बारवकर यांच्या राजकीय वाटचालीत प्रभारी नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून लोकसेवेचे नवे दालन खुले झाले आहे. राजकारणात पद हे केवळ प्रतिष्ठेचे प्रतीक नसून जनसेवेचे प्रभावी माध्यम असते. संघटनात्मक बांधिलकी, सातत्यपूर्ण लोकसंपर्क आणि नेतृत्वाने दाखविलेला विश्वास या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारकिर्दीतील हा एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे. नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात सातत्य राहावे, नागरिकांची कामे विनाविलंब मार्गी लागावीत, शहरातील विकास प्रकल्पांना अधिक गती मिळावी आणि लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय साधला जावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक पथदिवे, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा यांसह विविध नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या पदाच्या माध्यमातून त्यांना व्यापक कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या त्यांच्या कार्यशैलीला आता प्रशासकीय अधिकारांची जोड मिळाली आहे. दरम्यान, आमदार किशोरआप्पा पाटील, नगराध्यक्षा सुनीता पाटील आणि नगरपालिकेचे गटनेते सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पालिकेत सुरू असलेली विकासाची घोडदौड कायम राहणार असून, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास प्रत्यक्ष कामातून सार्थ करून दाखवणार असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष किशोर बारवकर यांनी सांगितले. पक्षनिष्ठा जपत जनसेवेचा वसा घेऊन वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालेली ही जबाबदारी संघटनात्मक कार्य करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांसाठीही प्रेरणादायी आहे. नेतृत्वाचा विश्वास, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि विकासाचा संकल्प या त्रिसूत्रीच्या बळावर किशोर बारवकर यांच्या प्रभारी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाचोरा शहराच्या विकासाला नवी ऊर्जा मिळावी, हीच झुंज वृतपत्र व ध्येय न्यूज पारिवारातर्फे त्यांच्या नव्या जबाबदारीनिमित्त सदिच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!