Home Dhyeya News Special पाचोऱ्यात अध्यात्मिक संस्कारांची शाळा : बालकांच्या घडवणुकीसाठी भव्य मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजन

पाचोऱ्यात अध्यात्मिक संस्कारांची शाळा : बालकांच्या घडवणुकीसाठी भव्य मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजन

0
421

Loading

पाचोरा – आजच्या यांत्रिक, धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये माणूस अनेक क्षेत्रांत भरभराट करत असला तरी त्याचा परीघ प्रामुख्याने भौतिक साधनसंपत्तीपर्यंतच मर्यादित राहिला आहे. घराघरांत आधुनिकतेचे आकर्षण, करिअरची स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचे अतिक्रमण हे आई-वडिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मात्र, त्याच वेळी आपल्या मुलांना दिले जाणारे प्रेम, वेळ आणि संस्कार या बाबतीत घराघरांत अघोषित दुष्काळ जाणवत आहे. मोबाईल, संगणक, इंटरनेट आणि विविध सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आजची पिढी परस्पर नात्यांपासून, सामाजिक शिस्तीपासून आणि अध्यात्मिक मूल्यांपासून दूर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी एक मोठे आश्वासक पाऊल ठरत आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ५ मे ते १५ मे २०२५ या कालावधीत शक्तीधाम, स्वप्नशिल्प हॉटेलसमोर, भडगाव रोड, पाचोरा येथे भव्यदिव्य मोफत राज्यस्तरीय वारकरी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर आणि ‘अनाथांची माय’ ह.भ.प. सुनीताताई पाटील हे असून, गेल्या सहा वर्षांपासून ही जोडी समाजाच्या मुल्यनिर्माणासाठी परिश्रमपूर्वक कार्य करत आहे. त्यांच्या संयोजनातून आणि आदरणीय रमेशजी मोर साहेब यांच्या अमूल्य सहकार्यामुळे हे शिबिर आज एक समाजव्याप्त अभियान बनले आहे.या शिबिरामध्ये मुलांना शिस्तबद्ध, व्यावहारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे धडे दिले जातात. सकाळी पाच वाजता सुरू होणारा दिनक्रम हा शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा आहे. सकाळी ५ ते ६ योगासन, संध्या व स्नान, ६ ते ७ गीता पाठ आणि विष्णुसहस्रनाम, ८ ते ९ अल्पोपहार, ९ ते १० रामरक्षा स्तोत्र व भजन, १० ते १२ विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन, १२ ते १ जेवण, १ ते ३ आराम, ३ ते ५ संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकासावर आधारित सत्र, ५ ते ६ हरिपाठ व पावली खेळ, ६ ते ७ मृदुंग व हार्मोनियमचे संगीत शिक्षण, ७ ते ८ रात्रीचे जेवण आणि ८ ते ९ दिवसभराच्या अभ्यासाचे पुनरावलोकन – या सर्वामधून मुलांची संपूर्ण जीवनशैली समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.सदर शिबिरामध्ये प्रत्येक मुलासाठी दोन वेळा उत्कृष्ट दर्जाचे जेवण, सकाळचा नाष्टा, दुपारी शीतपेय यांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा एक विशेष भाग म्हणजे मुलांना गीता, हरिपाठ, हनुमान चालीसा, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम यांसारखी धार्मिक पुस्तके भेट दिली जाणार आहेत. अध्यात्मिक अभ्यासाबरोबरच सामाजिक शिस्त, स्वावलंबन, सहकार्य, व्यावहारिक आचारधर्म या गोष्टींवरही विशेष भर दिला जातो. शिबिरात शेवटच्या दिवशी सहभागी मुलांना प्रमाणपत्र देखील देण्यात येते, जे त्यांच्या भावी शिक्षणात आणि सामाजिक सहभागात उपयोगी ठरणारे आहे. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे मुलांचे व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी, त्यांच्यातील संवाद कौशल्य, लोकाभिमुख वृत्ती, नेतृत्व क्षमता आणि भावनिक समज वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. विविध क्षेत्रातील यशस्वी, प्रेरणादायी वक्ते हे रोज मार्गदर्शनासाठी येतात, ज्यामुळे मुलांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होतो.योगेशजी महाराज व सुनीताताई पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, या शिबिरामध्ये पाचोरा आणि आजूबाजूच्या गावांमधील पालकांनी आपल्या पाल्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. मुलांना भौतिक साधनांची नव्हे, तर जीवनमूल्यांची, संस्कारांची, धार्मिक आस्थेची, संयमाची आणि समाजाशी बांधिलकीची गरज आहे. हे संस्कार घरून मिळायला हवे होते, परंतु वेळेअभावी जे कमी पडते ते या शिबिराच्या माध्यमातून भरून काढले जाते.लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था ही केवळ शिबिरपुरतीच मर्यादित नाही. या संस्थेमार्फत वर्षभर ६० अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण व संस्कार यांचे काम केले जाते. जेवण, कपडे, शिक्षण, औषधे आणि सर्व मूलभूत गरजा संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. त्यामुळे जर पाचोरा परिसरात किंवा जळगाव जिल्ह्यात कोठे आई-वडिलांविना जीवन जगणारी मुले असतील, तर त्यांना या संस्थेकडे पाठविण्याचे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.संस्थेचा दृष्टीकोन केवळ अध्यात्मिक शिक्षणापुरता नाही, तर सामाजिक जबाबदारी आणि मानवीय मूल्यांची रुजवणूक हाही संस्थेच्या कार्याचा भाग आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात वाहून न जाता, आपल्या पिढीला नीती, सत्य, सेवाभाव आणि संस्कारांची घडण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या संस्थेमार्फत सातत्याने होत आहे.शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या बालकांची नोंदणी पूर्वसूचनांच्या आधारे होत असून स्थानिक स्वयंसेवक, शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचेही विशेष योगदान शिबिर यशस्वी करण्यात मोलाचे ठरत आहे. शिस्त, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अध्यात्मिक प्रेरणा या सर्व गोष्टींचा संगम असलेले हे शिबिर मुलांसाठी केवळ एक धार्मिक उपक्रम नसून, जीवनाच्या मूलभूत सत्यांची ओळख करून देणारी शाळा बनले आहे.या शिबिराची सर्व तयारी अगदी नेटकेपणाने करण्यात आली असून प्रत्येक बाबतीत मुलांच्या सुरक्षिततेचा व सुसंस्कृततेचा विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. स्वच्छता, आरोग्य, पोषण आणि भावनिक स्वास्थ्य यांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तसेच सहभागी मुलांच्या पालकांशी संपर्क ठेवून त्यांना शिबिरात मुलांची प्रगती कळविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.शिबिराचे यश हे केवळ त्याच्या कार्यक्रमांवर नाही, तर त्या मागील सेवाभावी वृत्ती, श्रद्धा आणि अखंड कार्यक्षमतेवर आधारित आहे. पाचोऱ्याच्या समाजाला, विशेषतः मुलांमध्ये चांगुलपणा रुजवणाऱ्या या कार्यासाठी भाग्य लाभले आहे, असे म्हणावे लागेल.यामुळेच लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य, योगेशजी महाराज आणि सुनीताताई पाटील यांचा उपक्रम, आणि रमेशजी मोर साहेबांचे सहकार्य – हे सर्व मिळून एक अभूतपूर्व अध्यात्मिक आणि सामाजिक क्रांती घडवत आहेत. या शिबिराचा सहभाग अधिकाधिक वाढावा, हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजच्या या बातमीद्वारे प्रामाणिक अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!