Home Dhyeya News Special निष्पक्ष पत्रकारितेच्या दिशेने निर्णायक वाटचाल – व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय...

निष्पक्ष पत्रकारितेच्या दिशेने निर्णायक वाटचाल – व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचे मनोगत

0
66

Loading

नवी दिल्ली ( गणेश ज. शिंदे ) देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी निष्पक्ष पत्रकारिता अत्यंत आवश्यक असून, तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार जगत करत आहे. अशा परिस्थितीत सत्याचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांची एकजूट ही काळाची गरज बनली आहे, असे ठाम मत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
पाच दशकांहून अधिक काळात देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या आणि ५२ देशांतील सुमारे ४ लाख ७० हजार पत्रकारांचा सहभाग असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या या दोन दिवसीय अधिवेशनात संपूर्ण भारतभरातून राज्य अध्यक्ष, महासचिव, संपादक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे स्वतः होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून संघटना केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य, निवास, शिक्षण आणि सेवानिवृत्तीच्या हितासाठी कार्यरत आहे.
केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘‘प्रामाणिक पत्रकारांचे संरक्षण आणि सन्मान यासाठी संघटित प्रयत्न आवश्यक आहेत. पत्रकारांच्या मागण्या आणि समस्या यावर केवळ चर्चाच नव्हे, तर कृतीशील निर्णय घेणारी संघटना म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया आहे. आज जेव्हा माध्यमांवर व्यावसायिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे, तेव्हा अशा संघटना लोकशाहीचा किल्ला मजबूत करण्याचे कार्य करत आहेत.’’
या अधिवेशनात केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते देशभरातील राज्याध्यक्ष, महासचिव आणि मान्यवर पत्रकारांना पदग्रहण प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपस्थित पत्रकारांना देशहितासाठी आणि पत्रकारिता मूल्यांसाठी समर्पित राहण्याची शपथदेखील देण्यात आली.
या महत्त्वाच्या अधिवेशनात एकूण दहा ठराव एकमताने संमत करण्यात आले. या ठरावांचे वाचन राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी केले. यात पत्रकारांसाठी विमा सुरक्षा, निवृत्तीनंतरचा आधार, पत्रकारांसाठी सरकारी आरक्षण योजना, वकील संरक्षण यंत्रणा, प्रशिक्षण उपक्रम, डिजिटल ओळखपत्रांचे वैधता प्रमाणपत्र, जिल्हास्तरावरील पत्रकार सुरक्षा समिती, महिला पत्रकारांसाठी सुरक्षितता यंत्रणा, पत्रकार अपघात मदत निधी आणि फेक पत्रकारांवर कारवाई अशा विविध बाबींचा समावेश होता.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पत्रकार प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात ऊर्जा पाटील यांनी कोच, सायकोलॉजिस्ट व काउन्सिलर म्हणून देशभरातून आलेल्या पत्रकारांना संघटनात्मक बांधणी, टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून व्यावसायिक वातावरणात कार्यक्षम संघ कसा तयार करावा हे समजावून सांगितले.
अधिवेशनाचा दुसरा भाग विशेषतः पुरस्कार सोहळ्याने अधिक गौरवशाली ठरला. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ‘संसद भूषण’ पुरस्कार, आमदार समीर कुणावार यांना ‘विकास पुरुष’ पुरस्कार, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनघा समीर सराफ यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार, व्यंकटेश जोशी यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार, डॉ. पंजाब खानसोले यांना ‘विकास रत्न’ पुरस्कार तर पारधी सर यांना देखील त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात संघटनेच्या राष्ट्रीय कोअर टीमची नव्याने निवड करण्यात आली. या कोअर टीममध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी करण्यात आले असून, महाराष्ट्राचे अनिल म्हस्के, मध्यप्रदेशचे दीपक शर्मा, उत्तर प्रदेशाचे प्रेम पाठक, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, आसामच्या स्वप्ना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया आणि मेघालयचे कर्मलांग करिया यांचा समावेश आहे.
या निवडीमुळे देशभरातील पत्रकार संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रत्येक राज्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही अशीच धोरणात्मक बैठक, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील, असे संदीप काळे यांनी सांगितले.
अधिवेशनात ‘पत्रकार सुरक्षा कायदा’ लवकरात लवकर लागू करावा, फेक पत्रकार संघटनांवर बंदी आणावी, पत्रकारांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यात यावे, आणि पत्रकारांची नोंदणी अधिकृतरीत्या करण्यासाठी केंद्रीकृत पोर्टल तयार करावे, या बाबींबाबत ठोस मागण्या उपस्थित करण्यात आल्या.
हे अधिवेशन केवळ एक औपचारिक बैठक नव्हती, तर एक प्रेरणादायी चळवळ होती. ज्यामध्ये देशभरातून आलेल्या पत्रकारांनी अनुभवांची देवाणघेवाण केली, संघटनात्मक उद्दिष्टांची दिशा ठरवली आणि भविष्यातील पत्रकारितेच्या ध्येय-धोरणावर चर्चा केली.
व्हॉईस ऑफ मीडियाचे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकार बांधवांमध्ये एकजूट निर्माण करणारे, सत्यस्वरूप पत्रकारितेची ग्वाही देणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या पर्वाची नांदी करणारे ठरले आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी सशक्त लढा देण्याच्या निर्धाराने हे अधिवेशन संपन्न झाले.
संपूर्ण अधिवेशनात संयोजन व शिस्तबद्धता यांचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. माध्यम जगतातील सर्व स्तरांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव घेत आगामी काळात पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दिशेने सकारात्मक पुढाकार घेतल्याचे या दोन दिवसीय अधिवेशनातून स्पष्टपणे दिसून आले.
अशा प्रकारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या राष्ट्रीय अधिवेशनाने देशातील पत्रकार समाजात नवसंजीवनी निर्माण केली असून, ही वाटचाल निष्पक्ष, निर्भय आणि जनहितैषी पत्रकारितेकडे नेणारी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!