Home Dhyeya News Special जारगाव SBI शाखेचा आदर्श अनुभव : ग्राहकाभिमुख सेवेमुळे ग्रामीण भागातील विश्वासार्ह बँकिंग...

जारगाव SBI शाखेचा आदर्श अनुभव : ग्राहकाभिमुख सेवेमुळे ग्रामीण भागातील विश्वासार्ह बँकिंग केंद्र

0
405

Loading

पाचोरा – तालुक्यातील जारगाव हे गाव, जे पूर्वी केवळ विकासाचे गांव आणि ग्रामीण अर्थकारणासाठी ओळखले जात होते, आता तिथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेमुळे व व्यवसायामुळे फार मोठे आर्थिक उलाढालीचे एक आदर्श बँकिंग केंद्र म्हणून ओळखले जात आहे. पाचोरा शहरात अनेक मोठ्या बँका असताना, जारगावसारख्या ग्रामीण भागातील शाखेने आपल्या सेवेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या नम्र व पारदर्शक वागणुकीमुळे ग्राहकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कालच्या एका साध्या बँक भेटीतून मिळालेला अनुभव याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरला.
सध्या सर्वच व्यवहार आता डिजिटल होत असताना, बँकेत प्रत्यक्ष जाण्याची वेळ खूप कमीच येते. मात्र, काल कामानिमित्त जारगाव शाखेत जाण्याचा प्रसंग आला आणि तिथे जे वातावरण अनुभवायला मिळाले ते उल्लेखनीय होते. विशेष म्हणजे त्या वेळी शाखा व्यवस्थापक श्रीमती संगिता शिंदे, आणि शिपाई जयदीप कोळी बँकेच्या कामा निमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे शाखेत थोडा अधिक वेळ घालवावा लागला. या वेळेत तिथल्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करता आला आणि यामुळे एक सकारात्मक अनुभव मिळाला.
जारगाव SBI शाखेची वाटचाल ही पाचोऱ्याच्या सुपुत्रांनी घडवलेली यशोगाथा आहे. एकेकाळी पाचोरा शहरातील मोठ्या SBI शाखेतून नागरिक आपले व्यवहार चांगल्या सेवेच्या कारणाने इतर बँकेकडे स्पेशली HDFC बँकेकडे वर्ग करत असताना त्यावेळी जारगाव SBI शाखेचे व्यवस्थापक व पाचोऱ्याचे सुपूत्र अभिलाष (भाई) बोरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पाचोरेकरांनी जारगाव शाखेकडे ग्राहकांची पावले वळवली. मितभाषी व सेवाभावी वृत्ती असलेले श्री बोरकर यांनी त्या काळात आपल्या नम्र कार्यपद्धतीने जारगाव शाखेच्या सेवेला प्रगतीचे आलेखाचे वळण दिले. त्यांच्या बदलीनंतर आलेले नवे व्यवस्थापक विवेक हांडे साहेब यांनी देखील भाई बोरकर यांची परंपरा चालवत ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे काम नेटाने सुरू ठेवले.
कालच्या जारगाव SBI शाखेच्या भेटीत दिसून आले की, संपूर्ण शाखेत शासकीय धोरणानुसार नेहमीप्रमाणे या कार्यालयात सुद्धा कमी व मोजकाच कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. बँक व्यवस्थापक श्रीमती संगीता शिंदे, स्पे. असि. सुनिल महाजन , सहायक लिपीक श्री भामरे , शिपाई जयदिप कोळी, वॉचमन जगदीश पाटील हा संपूर्ण स्टाफ प्रत्येक जण बँकेचे कौटूंबिक सदस्य या नात्याने अत्यंत कार्यक्षमतेने आपापल्या जबाबदाऱ्या तर सोडाच परंतु इतरांच्या देखील जबाबदाऱ्या पार पाडत होते. कामांचे ठराविक विभाग न ठेवल्यासारखेच प्रत्येकजण ग्राहकांच्या गरजेनुसार पुढे सरसावून सेवा देत होते. कुणी ‘हे माझे काम नाही’ असे म्हणताना दिसले नाही. हेच खरे कार्यसंस्कृतीचे लक्षण आहे.
जर पाचोरा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर सद्यास्थितीत HDFC बँक सोडली तर पाचोऱ्यातील अनेक ग्राहकांच्या तक्रारी इतर बँकांच्या बाबत ऐकिवात आहेत. बहुतेक बँकांमध्ये ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांची अडवणूक, दुर्लक्ष, आणि “उद्या या”, “परवा या” अशा वाक्यांच्या सर्रास वापरामुळे सामान्य माणसाला बँकेत जायचे म्हणजे टेंशनचा विषय बनतो. मात्र, जारगाव शाखेत याचा पूर्णतः अभाव होता. येथे ना केवळ ग्राहकांची फसवणूक होते, ना त्यांच्या भावनांशी खेळ. येथे ग्राहकांशी प्रेमळ संवाद साधला जातो आणि त्यांची कामे वेळेत मार्गी लावली जातात.
जारगाव शाखेच्या व्यवस्थापनाकडे पाहिले असता, हे लक्षात येते की यांची सेवा ही केवळ ‘काम’ म्हणून मर्यादित नाही, तर ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून जोपासली जाते. विशेषतः संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला योजना, वृद्धपकाळ योजना अशा विविध शासकीय योजनांचे खातेधारक या शाखेत आहेत. या लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी मोबाईल नंबर लिंक असून शासनाचे अनुदान त्यांच्यापर्यंत वेळेत पोहचविण्यासाठी शाखेतील सर्व कर्मचारी कटिबद्ध आहेत. लाभार्थ्यांना कोणतेही अडथळे न येता त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत, यासाठी शाखेतील प्रत्येक जण जबाबदारीने काम करतो. हे फार मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
या सर्व अनुभवाच्या पार्श्वभूमीवर एक जुना प्रसंग आठवतो. काही वर्षा पूर्वी पाचोरा SBI मुख्य शाखेतील उप-व्यवस्थापक श्री. खोब्रागडे यांनी ‘ध्येय न्युज’ व ‘झुंज’ या स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक संदीप महाजन यांच्याशी वाद घातला होता. श्री.खोब्रागडे यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्या बाबत चुकीचे वक्तव्य केल्याने पाचोऱ्यातीलच नव्हे तर मुंबई स्तरावरील पत्रकारांनी आवाज उठवला होता. परिणामी मुंबई येथील SBI महाराष्ट्राच्या चिफ जनरल मॅनेजर यांनी तातडीने उच्चस्तरावरून चौकशी व दखल घेऊन पाचोरा SBI मुख्यशाखेचे व्यवस्थापक श्री. खोब्रागडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अखेर आमदार किशोरआप्पा यांच्या मध्यस्थिने आणि संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक व्यक्ती असल्याने अभिलाष बोरकर यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेची बाजी लावून हे प्रकरण शांत केले. अखेर श्री खोब्रागडे यांना लेखी माफी मागावी लागली परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील जंगल भागात श्री खोब्रागडे यांची बदली करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जर आज जारगाव शाखेतले वातावरण पाहिले, तर निश्चितच आश्वासक वाटते.
ग्राहकांशी आदराने वागून, त्यांची कामे वेळेवर, पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे केवळ नोकरीसाठी काम करत नाहीत. ते समाजाच्या विश्वासाला उत्तर देतात. प्रत्येक समाधानी ग्राहकाच्या मनातून निघणारी शुभेच्छा, दुवा ही त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठीही अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळेच जारगाव SBI शाखेचे कार्यकर्तृत्व केवळ खात्यांची संख्या , डिपॉझीट, कर्जाचे क्रीम ग्राहक वाढवणारे नाही, तर मनं जिंकणारे आहे.
ग्रामीण भागातही उत्कृष्ट बँकिंग सेवा देऊन विश्वासार्हतेचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जारगाव शाखेचे हे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. या शाखेत बँक म्हणजे एक ताणतणावाचे ठिकाण नसून, मदतीचा आणि विश्वासाचा केंद्रबिंदू बनले आहे. या शाखेचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि संपूर्ण बँक टीम यांचे यासाठी विशेष कौतुक करावे लागेल. पाचोऱ्यासह परिसरातील इतर बँकांनी जारगाव SBI शाखेच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा, हीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!