Home Dhyeya News Special कर्नाटक एक्स्प्रेसमधील गुटखा तस्करीचा पर्दाफाश; पाचोऱ्याचा तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात, संपूर्ण रॅकेट...

कर्नाटक एक्स्प्रेसमधील गुटखा तस्करीचा पर्दाफाश; पाचोऱ्याचा तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात, संपूर्ण रॅकेट उघड करण्याची संदीप महाजन यांची मागणी

0
1311

Loading

पाचोरा : अवैध गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला नवे वळण मिळाले असून लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये धडक कारवाई करत पाचोऱ्यातील एका तरुणाला प्रतिबंधित गुटख्यासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १७ हजार १५२ रुपये किमतीचा विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून रेल्वे पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करीच्या विस्तृत साखळीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर आता संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा परिसरात दीर्घकाळ गुटख्याच्या अवैध व्यवसायाशी संबंधित म्हणून चर्चेत असलेली करण–अर्जुन बाप–बेट्याची जोडी काही काळापासून आपले जाळे पाचोऱ्यापुरते मर्यादित न ठेवता पाचोरा बायपासमार्गे थेट नाशिकपर्यंत विस्तारल्याची चर्चा सुरू होती. या हालचालींची गोपनीय माहिती रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा विभागापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी सतर्कता बाळगत विशेष पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याच अनुषंगाने रेल्वे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई यशस्वी केल्याचे समजते. पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिसांचे विशेष पथक कर्नाटक एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वर दाखल होण्यापूर्वीच सज्ज झाले होते. संशयित प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान विनय अर्जुन खेमानी (वय २०, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याच्याकडील तीन बॅगांची झडती घेण्यात आली. त्यामध्ये विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. प्राथमिक चौकशीत हा माल त्याने बऱ्हाणपूर येथून आणल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर पोलिसांनी तातडीने जप्तीची कारवाई केली. मात्र या प्रकरणात केवळ एका व्यक्तीला ताब्यात घेऊन कारवाई पूर्ण झाल्याचे मानणे योग्य ठरणार नाही, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मालाची वाहतूक ही एखाद्या व्यक्तीच्या बळावर शक्य नसून त्यामागे पुरवठादार, वाहतूकदार, आर्थिक गुंतवणूकदार, साठेबाज आणि वितरक यांचे संघटित जाळे कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ वाहकापुरता मर्यादित न राहता संपूर्ण साखळीच्या मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर झुंज वृत्तपत्राचे व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर करून या गुटखा तस्करी प्रकरणाचा तपास संपूर्ण रॅकेटपर्यंत नेण्याची ठाम मागणी केली आहे. या अवैध व्यवसायामागील सर्व सूत्रधारांचा शोध घेतल्याशिवाय गुटखा माफियांना आळा बसणार नाही. तपासाचा विस्तार करून मोठे आणि छोटे अशा सर्व स्तरांवरील संबंधितांना कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले, तरच ही कारवाई खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या अवैध तस्करीला प्रभावी प्रतिबंध घालता येईल, असे संदीप महाजन यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!