![]()
पाचोरा : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन शिक्षण पूर्ण झाले, अशी भूमिका न घेता त्यांना स्वबळावर करिअर घडविण्यासाठी हाताशी धरून रोजगाराच्या संधीपर्यंत पोहोचविणे आणि नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवणे, हीच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूलच्या किमान कौशल्य (MCVC) विभागाची खरी ओळख ठरत आहे. याच परंपरेला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, इलेक्ट्रीकल ट्रेडचे विद्यार्थी गौरव प्रभाकर काळे (डोंगरगाव) आणि यश शांताराम हिवाळे (भोजे) यांची भारतातील अग्रगण्य औद्योगिक समूह असलेल्या टाटा मोटर्स, पुणे येथे निवड झाली आहे. ही निवड क्विस कॉर्प लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. शालेय शिक्षणादरम्यानच प्रतिष्ठित कंपनीत रोजगाराची संधी मिळाल्याने दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या यशामुळे किमान कौशल्य शिक्षणाच्या प्रभावीतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच १८ हजार रुपये मासिक वेतन, कंपनीची कँटीन सुविधा, बस सुविधा, वैद्यकीय सुविधा तसेच इतर सर्व कर्मचारी लाभ उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नोकरी करत असतानाच त्यांचे पुढील शिक्षणही सुरू राहणार असून, नामांकित विद्यापीठाच्या माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअर होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारासोबत उच्च शिक्षणाचा मार्गही त्यांच्यासाठी खुला झाला आहे. ‘कमवा व शिका’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्वावलंबनासोबतच व्यावसायिक अनुभवही मिळणार आहे. उद्योगविश्वाच्या गरजेनुसार तयार होणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी MCVC विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, त्याचेच हे यशस्वी फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. श्री गो. से. हायस्कूलच्या किमान कौशल्य विभागाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ वर्गखोलीपर्यंत मर्यादित राहत नाही. प्रवेशापासून कौशल्य विकास, उद्योगजगताशी संपर्क, मुलाखतींची तयारी, योग्य कंपनीची निवड, नोकरीची संधी आणि प्रत्यक्ष कंपनीत रुजू होईपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. एवढेच नव्हे, तर विद्यार्थी कंपनीत रुजू झाल्यानंतरही त्यांच्या कामकाजाची, प्रगतीची, पुढील शिक्षणाची आणि करिअरमधील वाटचालीची नियमित माहिती घेत त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेली ही सातत्यपूर्ण बांधिलकीच या विभागाला इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक विश्वासार्ह बनवते. या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाघमोडे साहेब (पुणे), प्रा.मनीष बाविस्कर सर आणि प्रा.शरद माथुरवैश्य सर यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्योग क्षेत्राशी सातत्याने समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ,उच्च न्यायालयातील विधी तज्ञ संस्थेचे सेक्रेटरी दादासाहेब ॲड.महेश देशमुख, संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, शालेय तांत्रिक समितीचे चेअरमन वासुदेवआण्णा महाजन आणि प्राचार्य एन. आर. पाटील यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उपप्राचार्य आर. एल. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रा मनीष बाविस्कर,पर्यवेक्षक बंठिया सर, अंजली गोहिल मॅडम, महेश कोंडिंन्य, बोरसे सर आणि कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगारक्षम बनविण्याची गरज आहे. ही गरज ओळखून श्री गो. से. हायस्कूलचा MCVC विभाग कौशल्याधारित शिक्षण, उद्योगांशी थेट संपर्क आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर घडविण्याचे काम सातत्याने करत आहे. त्यामुळेच या विभागातून घडणारे विद्यार्थी केवळ शिक्षण पूर्ण करणारे नसून, उद्योगविश्वात आत्मविश्वासाने पाऊल ठेवणारे आणि स्वतःचे भविष्य घडविणारे कुशल युवा म्हणून पुढे येत आहेत. गौरव काळे आणि यश हिवाळे यांच्या यशामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीला आणखी एक भक्कम मान्यता मिळाली असून, आगामी काळातही अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अशाच यशोगाथा येथे घडत राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





























